कोरोनाचं भयाण वास्तव; अहमदनगरमध्ये एकाच वेळी २२ कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार

    अहमदनगर : राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मृत्यूचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे.  कोरोनाने पहिल्या लाटेत पुणे आणि मुंबई सारख्या शहरांना झोडपून काढलं होतं. दरम्यांन कोरोनाने आता फक्त शहरी भागात नव्हे तर ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. अहमदनगरच्या अमरधाम स्मशानभूमीतील काळजाचा थरकाप उडवणारी घटना आहे. या अमरधाममध्ये एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार करावे लागले. तर दिवसभरात 42 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यामुळे कोरोनाचं भयाण वास्तव समोर आलं आहे.
    विद्युत दाहिनीच्या कमतरतेमुळे अमरधाममध्ये हे हृदयद्राव्य चित्र पाहायला मिळालं आहे. विद्युत दाहिनीत दिवसभरात 20 जणांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यामुळे बाकीच्या 22 जणांचे अंत्यसंस्कार एकाच वेळी सरणावर करण्यात आले.
    अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनामुळे आतापर्यंत 1270 जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर महापालिकेसमोर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचं मोठं आव्हान आहे. शववाहिनेचा तुटवडा देखील जिल्ह्यात जाणवत आहे. एकाच वेळी शववाहिनीतून 6 जणांचे मृतदेह भरून नेण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे.