‘पप्पा बोलाना, उठाना…मला पप्पा पाहिजे…’; आत्महत्या केलेल्या डॉक्टर शेळकेंच्या स्वराची आर्त हाक

  नेवासा/संदीप वाखूरे : माझ्याबरोबर बोलाना पप्पा…मला पप्पाकडे जायचं आहे…पप्पाला पेटवू नका…बोलाना पप्पा…दिवंगत डॉक्टर शेळके यांची मुलगी स्वरा या चिमुकलीच्या आर्त हाकेने संपूर्ण बहिरवाडी ग्रामस्थ गहिवरुन गेले. बुधवारी दुपारी दोन वाजता डॉ. गणेश शेळके यांच्यावर बहिरवाडी येथे त्यांच्या घरी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

  पाथर्डी तालुक्यातील करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश शेळके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. घटनेनंतर काही वेळातच डॉ. दराडे यांचा फोन स्विच ऑफ झाला. आपलं घरदार सोडून कोरोना काळात डॉ शेळके यांनी चांगले काम केले. पाथर्डी तालुक्यात डॉ शेळके यांनी केलेल्या कामाचे कौतुक होत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने नेवासा व पाथर्डीसह जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. डॉक्टर शेळके यांचे प्राथमिक शिक्षक असलेले लहान बंधू सतीश शेळके यांनी मृतदेहाची झालेली हेळसांड आणि एका डॉक्टरची अशी हाल होत असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न करत घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. अंत्यसंस्कारावेळी पोलीस निरीक्षक विजय करे यांनी बहिरवाडी येथे येऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तर यावेळी राखीव पोलिसांची तुकडही बोलावली होती.

  मृतदेहाचा चोवीस तासाचा प्रवास

  करंजी येथून डॉ. शेळके यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, त्याठिकाणी काही उपयोग झाला नाही. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नगरला जाण्यास सांगितले. नगर येथे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी उत्तरीय तपासणी करतो, असे सांगितले. मात्र, ज्यांनी सांगितले त्या अधिकाऱ्यांची ड्युटी संपलेली होती. दुसरे वैद्यकिय अधिकारी हजर झाले त्यांनी स्पष्ट नकार देऊन उत्तरीय तपासणी नगर येथे होत नाही. फोरेन्सिक ही प्रणाली उपलब्ध नसल्याचे सांगितले.

  पुणे येथील ससून व औरंगाबाद येथील घाटी येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणी करावी असे सांगितले गेले. रात्री दोन वाजता नगर येथून औरंगाबाद येथील घाटी येथे शेळके यांचा मृतदेह आणण्यात आला. एका आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मृतदेहाचे हाल होणे ही गोष्ट लाजिरवाणी आणि संतापजनक असल्याची भावना उपस्थितांमध्ये आहे. मंगळवारी दोन वाजता आत्महत्या केल्यानंतर बुधवारी दुपारी अडीच वाजता मयत डॉ शेळके यांच्यावर नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

  डॉक्टरच्या चिठ्ठीप्रमाणेच कायदेशीर कारवाई होईल : मुंढे

  मयत डॉ. गणेश शेळके यांनी आत्महत्येवेळी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यातील जबाबदार असलेल्यांचा शोध घेऊन त्यांची कायदेशीर चौकशी आणि कारवाई होईल. ही दुर्दैवी घटना आहे. आम्ही पोलीस दलातर्फे डॉ. शेळके याना श्रद्धांजली अर्पण करतो. कारवाईत कोणतीही कसूर केली जाणार नसल्याचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे व संदीप मिटके यांनी सांगितले.

  पप्पा चांगले होते…पप्पाने काय केलं होतं

  माझे पप्पा चांगले होते…पप्पाने काय केले होते…मला पप्पा सोबत जायचं असे म्हणत डॉ शेळके यांची स्वरा या पहिलीत शिक्षण घेत असलेल्या मुलीने चितेला अग्नी दिल्यानंतर हंबरडा फोडला. ही घटना बघणाऱ्यांची मने तर सुन्न झाली. माझ्या पप्पाला पेटवू नका पेटवल तर मी कोणाला सोडणार नाही. पप्पा उठाना माझ्यासाठी… मला खूप जीव लावायचे पप्पा.. असे सांगत स्वरा ही चिमुकली आपल्या अश्रूंना वाट करून देत होती. चिमुकलीच्या रडण्याने पोलीस अधिकाऱ्यांचे ही डोळे पाणावले.