शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी

-क्रांतीसेनेचे युवक जिल्हाध्यक्ष युवराज सातपुते यांचे प्रांताधिकार्‍यांसह महावितरणला निवेदन 

संगमनेर : संगमनेर शेतकर्‍यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन संगमनेर भागाचे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, महावितरणचे सहाय्यक उपअभियंता भांगरे यांना अखिल भारतीय क्रांती सेनेच्यावतीने नुकतेच देण्यात आले.

संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये बिबटे, तरस, कोल्हे व रानडुक्कर अशा हिंस्र प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यातच महावितरण कंपनी एक आठवडा दिवसा व एक आठवडा रात्रीची थ्री फेज वीज पुरवठा करत आहे. हिंस्र प्राण्यांच्या भीतीमुळे शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाऊ शकत नाही. पिकांना पाणी असूनही शेतकरी हिंस्र प्राण्यांच्या भीतीमुळे रात्रीच्या वेळी शेतात जात नाही. परिणामी पिकांना वेळेत पाणी उपलब्ध न झाल्याने सरासरी उत्पादनात घट येऊन शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.