कामकाजात सुधारणा करा, नाहीतर…; उपमहापौर भोसलेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना इशारा

    अहमदनगर : महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांना आपल्या कामाचा मोबदला दिला जात आहे. त्यामुळे दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून नागरिकांचे प्रश्न सोडवावे. आम्ही कोणालाही बळजबरीने नाहक त्रास देणार नाही. पण यापुढील काळात प्रत्येकाने चांगले काम करून स्वच्छ, सुंदर शहरासाठी काम करावे. त्यात हलगर्जीपणा केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. वेळ पडल्यास निलंबितही केले जाईल. हे टाळण्यासाठी सर्वांनी कामकाजात सुधारणा करून महापालिककेच्या कारभारात शिस्त आणावी, असे आवाहन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.
    महानगरपालिकेत घनकचरा विभागाची आढावा महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले यांनी घेतली. उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ. सतिश राजूरकर, घनकचरा विभागाचे अधिकारी डॉ.शंकर शेडाळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक सचिन शिंदे, निखिल वारे, सचिन जाधव, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर यावेळी उपस्थित होते.
    नगर शहरामध्ये आता ठिकठिकाणी कचरा न उचलल्यामुळे कचऱ्याचे ढीग दिसत आहे. पूर्वी कचरा उचलल्यानंतर प्रत्येक प्रभागाप्रमाणे निर्जंतुकीकरण पावडर मारली जात होती. आता ती मारली जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. घनकचरा विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याने गणवेष व ओळखपत्रामध्ये कामावर यावे, अशा सूचना घनकचरा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गणेश भोसले यांनी दिल्या.