शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाण्याचा बेत आखताय? पण आधी ‘ही’ नियमावली जाणून घ्या!

सरकारच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करतानाच शिर्डीत येणाऱ्या भाविकांची रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि वाहनतळावरच करोना चाचणी करण्यात यावी, निगेटिव्ह आढळलेल्या भाविकांनाच मंदिरात येऊ द्यावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

    अहमदनगर (Ahmednagar) : राज्यातील धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबरपासून खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. नगर जिल्ह्यात मात्र करोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने योग्य नियोजन करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. शिर्डीचे मंदिरही खुले होणार असून त्यासाठी तयारी करण्यात आली आहे. सरकारच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करतानाच शिर्डीत येणाऱ्या भाविकांची रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि वाहनतळावरच करोना चाचणी करण्यात यावी, निगेटिव्ह आढळलेल्या भाविकांनाच मंदिरात येऊ द्यावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

    तयारीचा आढावा आणि नियोजन करण्यासाठी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डीत बैठक घेण्यात आली. राहाता व शिर्डीमधील महसूल, पोलीस, आरोग्य, बांधकाम, नगरपालिका, रेल्वे, एस.टी, विमानतळ व इतर सर्व शासकीय विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामकाज करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

    बाणायत म्हणाल्या, प्रशासनाने भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झालं पाहिजे. प्रत्येकाने सहा फुटांचे अंतर पाळणे, मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक व सॅनिटायझरने वारंवार हात धुणे, या करोना नियमावलीतील मुख्य तीन नियमांचे पालन भाविक व नागरिकांकडून झालं पाहिजे. यासाठी प्रशासनाने सतर्क राहावं. अशावेळी जे नियमावलीचे पालन करणार नाहीत अशांवर दंडात्मक कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.