संरक्षणाची हमी देणारा कायदा करण्यास सरकारकडून चालढकल; डॉक्टरांची ओपीडी उद्या बंद

    अहमदनगर : कोरोना संकटकाळात सेवा बजावल्यानंतरही संरक्षणाची हमी देणारा कायदा करण्यास केंद्र सरकारकडून चालढकल केली जात आहे. राज्य सरकारने केलेला कायदा बिन कामाचा आहे. केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील डॉक्टरांनी शुक्रवारी (दि. १८) संपाचे हत्यार उपसले आहे. त्याला पाठिंबा म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टरांची ओपीडी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत बंद असणार आहे. आयएमएनगर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे यांनी ही माहिती दिली.

    गेल्या वर्षात देशात २७२ तर राज्यात ५७ डॉक्टर आणि हॉस्पिटलवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. डॉक्टर सुरक्षित नाहीत. राज्य शासनाने केलेला कायदा काही कामाचा नाही. केंद्र शासनाने कायदा केल्यानंतर आयपीसी कलमांर्तगत कारवाई होईल. मात्र, हा कायदा करण्यास दिरंगाई होत आहे. हा कायदा व्हावा, याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील डॉक्टर उद्या संप करणार आहेत. अहमदनगरमधील ३० हजार डॉक्टरांनी त्याला पाठिंबा दिला आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत डॉक्टर ओपीडी बंद ठेवणार आहेत. या काळात इमर्जन्सी आणि ऍडमिट पेशंट तपासली जातील असे सचिव डॉक्टर सचिन वाहाडणे यांनी सांगितले.

    ‘ते’ नातेवाईक ब्लॅकलिस्ट

    डॉक्टरवर किंवा हॉस्पिटलवर हल्ला करणाऱ्या नातेवाईकांना ब्लॅकलिस्ट केले जाणार आहे. ब्लॅक लिस्टमधील नातेवाईक भविष्यात हॉस्पिटलला आल्यास त्यांच्यावर कोणतेच उपचार केले जाणार नाहीत. तसा ठराव आयएमए संघटना घेणार असल्याचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य डॉक्टर निसार शेख यांनी सांगितले.