मुख्यमंत्र्यांना ‘ती’ गर्दी दिसत नाही का? : राधाकृष्ण विखे-पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवर कायद्याची बंधने घालणार्‍या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या पदग्रहण सोहळ्यात आणि मंत्र्यांच्या मिरवणुकांमध्ये झालेली गर्दी दिसत नाही का? असा परखड सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.

    संगमनेर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवर कायद्याची बंधने घालणार्‍या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या पदग्रहण सोहळ्यात आणि मंत्र्यांच्या मिरवणुकांमध्ये झालेली गर्दी दिसत नाही का? असा परखड सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.

    तालुक्यातील शिबलापूर माळवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार विखे बोलत होते. याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी निघुते, पंचायत समिती सदस्य गुलाब सांगळे, भगवान इलग, रखमाजी खेमनर, संचालक दिनकर गायकवाड, संदीप घुगे, तबाजी मुंतोडे, सरपंच सचिन गायकवाड, उपसरपंच दिलीप मुंतोडे आदी उपस्थित होते.

    छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ३९१ वर्षांंनंतरही तेवढ्याच उत्साहाने साजरी होणे याचे महत्व मोठे आहे. परंतु छत्रपतींच्या नावाने राजकारण करुन सत्तेची पद मिळवलेल्या शिवसेनेने महाराजांच्या जयंती दिनाचे महत्व कमी करण्याचा निर्णय करावा याचे आश्चर्य वाटते. एकीकडे कोरोनाचे कारण सांगून जयंती दिनाच्या कार्यक्रमावर बंधने आणली जातात. पण दुसरीकडे सत्तेत भागीदार असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्या पदग्रहण समारंभात कोविडचे नियम तोडून गर्दी होते, राज्यात मंत्र्यांचे दौरे गर्दीतच सुरू आहेत हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाहीत का असा परखड सवाल आमदार विखे यांनी उपस्थित केला.