Bribe

लाचखोर अभियंत्याने यापूर्वी देखील गावातील अनेक लोकांना पैशांची मागणी करून त्रास दिला होता. त्याच्या या कार्यपद्धतील सर्वसामान्य नागरिक वैतागले होते. लाचखोर भ्रष्ट अभियंत्यावर कारवाई झाल्यामुळे लिंपणगाव येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

  श्रीगोंदा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ग्रामपंचायतीचा खंडित केलेला विद्युतपुरवठा पुन्हा सुरळीत करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणारा लिंपणगाव येथील वीज मंडळातील कनिष्ठ अभियंता पांडू पुनाजी मावळी (वय ३६) लाचेच्या जाळ्यात अडकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडले आहे.

  लिंपणगाव ग्रामपंचायतीचे विद्युत बिल थकलेले असल्यामुळे वीज मंडळाने ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन तोडले होते. त्यामुळे गावचा पाणीपुरवठा बंद झाला होता. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे तक्रारदाराने कनिष्ठ अभियंता पांडू मावळी यांची भेट घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करून देण्याची विनंती केली होती. वीजपुरवठा सुरळीत करून देण्यासाठी मावळी यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली होती.

  तक्रारदाराने नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार आज लाचलूचपत विभागाच्या पथकाने सापळा लावत लिंपणगाव येथील हॉटेल श्रावणी येथे पंचासमक्ष १५ हजारांची लाच स्वीकारताना या अभियंत्यास पकडले.

  अनेकांकडे लाचेची मागणी

  लाचखोर अभियंत्याने यापूर्वी देखील गावातील अनेक लोकांना पैशांची मागणी करून त्रास दिला होता. त्याच्या या कार्यपद्धतील सर्वसामान्य नागरिक वैतागले होते. लाचखोर भ्रष्ट अभियंत्यावर कारवाई झाल्यामुळे लिंपणगाव येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

  आठवड्याभरात दुसरी कारवाई

  मागील आठवड्यातच बेलवंडी पोलीस स्टेशनमधील लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्याला आठवडा उलटला नाही तोच आज पुन्हा विजमंडळातील हा अभियंता रंगेहाथ सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.