पारनेरमध्ये बनावट नोटा कारखान्याचा पर्दाफाश; पारनेर पोलिसांची कारवाई

    पारनेर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : एटीएम चोरणाऱ्या टोळीचा मोरक्याच्या घरातून पोलिसांनी बनावट नोटा आणि त्या छापण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. पारनेर पोलिसांनी वडगाव सावताळ गावात ही कारवाई केली. विकास सुरेश रोकडे (रा. वडगाव सावताळ, तालुका पारनेर) असे बनावट नोटा छापणाऱ्या मास्टर माईंडचे नाव आहे.

    २६ ऑगस्टच्या रात्री टाकळी ढोकेश्वर गावातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम चोरी प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली होती. त्यात रोकडे ही अटकेत होता. तोच या टोळीचा मास्टरमाईंड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्ह्याचा तपास सुरू असताना रोकडे हा बनावट नोटा छापत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या वडगाव सावताळ येथील घराची झडती घेतली असता पोलिसांना ५०० आणि १०० रुपयांच्या छापलेल्या बनावट चलनी नोटा, त्या नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे रंग, प्रिंटर, कागद, कटर,कात्री असे साहित्य पोलिसांनी त्यांच्या घरातून जप्त केले.

    पारनेर पोलिसात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोकडे हा सराईत गुन्हेगार असून अनेक गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. बनावट नोटा. छापणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी वर्तविली आहे.

    रोकडे यांनी कोणास बनावट चलनी नोटा देऊन फसवणूक केली असेल अथवा बनावट चलनी नोटा संदर्भात काही दुसरा गुन्हा केला असेल तर त्यांनी पारनेर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.