murder by firing

    नेवासा : नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे संकेत भाऊसाहेब चव्हाण (वय-२५) हे रात्री घरी येत असताना अज्ञात दोघांनी गावठी पिस्तूलातून गोळ्या मारून तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये संकेत चव्हाण गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. त्यांच्या हातापायावर चार गोळ्या लागल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.

    संकेत चव्हाण हे बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य असून, किक बॉक्सिंगचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. संकेत चव्हाण यांच्यावर
    गोळ्या झाडून हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले आहेत. हल्ल्यामागाचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात संकेत यांचे वडील भानुदास जगन्नाथ चव्हाण यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून बाळासाहेब भाऊसाहेब हापसे व विजय विलास भारशंकर (दोघेही रा.बऱ्हाणपूर ता.,नेवासा) यांच्या विरोधात शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    घटनेची माहिती समजताच शेवगाव उपविभागीय अधिकारी सुर्दशन मुंढे, शिंगणापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक
    सचिन बागूल हे तातडीने घटनास्थळी हजर झाले होते. चांद्यातील घटनेला पंधरा दिवस उलटत नाही तोच बऱ्हाणपूर येथे झालेल्या भयंकर घटनेने नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे.