डॉक्टर महेंद्र थोरात आणि त्यांचे कुटुंबीय
डॉक्टर महेंद्र थोरात आणि त्यांचे कुटुंबीय

महेंद्र यांनी आपली पत्नी वर्षाराणी, मुलगा कृष्णा आणि कैवल्य यांना सलाईनद्वारे विषारी इंजेक्शन दिले आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    अहमदनगर (Ahmednagar). जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन गावात पत्नीसह दोन मुलांना मारुन डॉक्टरने आत्महत्या केली आहे. मुलाला कमी ऐकू येत असल्यानं समाजात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं महेंद्र थोरात यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलं आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

    राशीनमधील प्रसिद्ध डॉक्टर महेंद्र थोरात यांनी राहत्या घरी पत्नी आणि दोन लहान मुलांना सलाईन द्वारे इंजेक्शन देऊन स्वत: गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. राशीन मधील प्रसिद्ध डॉक्टर महेंद्र थोरात यांनी त्यांच्या राहत्या घरी पत्नी आणि दोन मुलांना मारुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. डॉक्टर महेंद्र थोरात, वर्षाराणी थोरात, कृष्णा थोरात आणि कैवल्य थोरात अशी चौघा मृतांची नावं आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

    महेंद्र थोरात यांनी आपल्या राहत्या घरीच आत्महत्या केली. सुरुवातीला महेंद्र यांनी आपली पत्नी वर्षाराणी, मुलगा कृष्णा आणि कैवल्य यांना सलाईनद्वारे विषारी इंजेक्शन दिले आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेनंतर कर्जत पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चौघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत

    दरम्यान महेंद्र थोरात यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत ‘आपला थोरला मुलगा कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी येत आहे, त्यामुळे त्याला समाजात अपमानास्पद वागणूक मिळत आहे. हे आम्हाला अपराध्यासारखे वाटत आहे, त्यामुळे व्यथित होऊन मी आणि माझ्या पत्नीने मिळून हा निर्णय घेतला आहे आणि आत्महत्या करत आहोत’, असा उल्लेख करण्यात आलेला आहे.

    महेंद्र थोरात यांची गरिबांचे डॉक्टर अशीही ओळख होती. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमुळे राशीन गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर या घटनेमुळे राशीन गावांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या महेंद्र थोरात यांनी आत्महत्या केल्याने कर्जत तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.