ऊसाला २८०० रुपये प्रतिटन भाव द्या, अन्यथा…; माजी आमदार मुरकुटे यांचा इशारा

  नेवासा : भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाने ऊसाला २८०० रुपये प्रति टन भाव द्यावा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिला आहे. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना हा माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या व्यवस्थापनाच्या ताब्यात आहे.

  साखर कारखाना व्यवस्थापनाने अद्यापही अंतिम भाव जाहीर केलेला नाही. ऊसाला २८०० रूपये भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. आठ दिवसांत त्यासंदर्भात निर्णय न घेतल्यास कारखाना गेटवर आमरण उपोषण करण्याचा इशारा भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिला आहे.

  भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक अनिल शेवाळे व व्हाईस चेअरमन पांडुरंग अभंग यांच्याकडे निवेदन देण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी अंकुश काळे, भाऊसाहेब फुलारी, भाऊराव नगरे, अण्णासाहेब गव्हाणे, दत्तुकाका काळे, थोटे पाटील, अमोल कोलते यांनी हे निवेदन दिले.

  निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, यावर्षी गाळप झालेल्या ऊसाचे दर राज्यामध्ये सर्वाधिक ३१०० आत्तापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. यावर्षी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने १४ लाख ५१ हजार मेट्रिक टन ऊसाची गाळप केले आहे. कारखान्याने अत्तापर्यंत २१०० रुपये भाव शेतकऱ्यांना दिलेला आहे.

  पत्राची दखल नाहीच…

  २०२०-२१ या हंगामाचा ऊस भाव निश्चित करण्यासाठी वेळोवेळी आपणास पत्र दिलेले आहे. मात्र, आपण त्याची दखल घेतली नाही. ऊस हंगाम समाप्ती झालेली असताना अद्यापही अंतिम भाव जाहीर केलेला नाही. आता २८०० रुपये प्रति टन भाव देण्यात यावा. अन्यथा आठ दिवसानंतर कारखाना गेट समोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.