विद्युत रोहित्र दिले जात नसल्याने माजी आमदार कोल्हे आक्रमक; वीज मंडळाच्या कार्यालयात ठिय्या

    कोपरगाव : कोरोना महामारीच्या काळात मोठ्या आर्थिक संकटाला शेतकरी बांधव सामोरे जात असताना वीज वितरण कंपनी या बांधवांना आणखी आर्थिक खाईत लोटण्याचे काम करत आहे. बिले भरूनही विद्युत रोहित्र दिले जात नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने रोहित्र बसवून देण्याची मागणी करत वीज मंडळाच्या कार्यालयात ठिय्या मांडला.

    वीज वितरण कंपनीच्या कोपरगाव येथील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाउन कोल्हे यांनी उपस्थित सहायक अभियंता दिनेश चावडा यांना मतदारसंघातील विद्युत रोहित्राअभावी होत असलेल्या नुकसानासंदर्भात धारेवर धरले. यावेळी विविध गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते. कोल्हे म्हणाल्या की, सध्या विजेचा खेळखंडोबा सुरू अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या भावनेशी खेळ सुरू आहे. कोरोनासारख्या महामारीच्या संकटात अनेक कुटुंबांना आर्थिक फटका बसला आहे. सध्या पावसाने ओढ दिली असून, विहिरीच्या पाण्यावर जनावरांच्या चा-यांसह इतर पिकांची लागवड केली आहे.

    आर्थिक परिस्थिती नसतानाही पिके उभी केली. परंतु वीज वितरण कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे हाती आलेली पिके वाया जात आहे. त्याचप्रमाणे वारंवार वीजबिले भरण्याची मागणी करून मनस्ताप देण्याचे काम केले जात आहे. वीज वितरण कंपनीच्या मागणीप्रमाणे वीजबीले भरूनही विद्युत रोहित्र बसविण्यास टाळटाळ केली जात असून, महिनोमहिने विद्युत रोहित्र देण्यात टाळाटाळ करून अधिकारी विद्युत रोहित्र वाटपात दुजाभाव करीत असल्याचा आरोपही कोल्हे यांनी यावेळी केला.

    ब्राम्हणगाव येथील वाकचौरे रोहित्र गेल्या एक महिन्यापासून जळालेली आहे. वारंवार मागणी करूनही दुरूस्ती केली जात नाही, यामुळे महिनाभरापासून येथील नागरिकांसह जनावरेही पाण्यापासून वंचित आहे. अनेक कुटुंबाच्या घरातील लाईटही बंद असल्याने शेतकरी बांधवामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या परिस्थितीमध्ये वीज मंडळ त्यांना दुजाभावाची वागणूक देऊन त्यांच्या भावनांशी खेळत आहे. ही अन्यायकारक भूमिका आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. विद्युत रोहित्र तातडीने दुरूस्त करून शेतकऱ्यांना न्याय दयावा. अन्यथा वीज वितरण मंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोल्हे यांनी दिला.

    राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता सांगळे, कार्यकारी अभियंता मुळे यांच्याशी संपर्क साधून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विद्युत पुरवठा तातडीने सुरळीत करून नादुरूस्त विद्युत रोहित्र तातडीने बसवून देण्याची मागणीही कोल्हे यांनी यावेळी केली.