नगरमध्ये चार जणांची निर्घृण हत्या, परिसरात एकच खळबळ

अहमदनगर – श्रीगोंदा तालुक्यात चार जणांची चाकूने निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथील परिसरात घडली. या घटनेमुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, नातीक कुंज्या चव्हाण , श्रीधर कुंज्या चव्हाण , नागेश कुंज्या चव्हाण आणि लिंब्या हबऱ्या काळे  अशी हत्या झालेल्या चौघांची नावे आहेत. सुरेगाव येथील मृत व्यक्तींचा आणि अन्य काही लोकांचा गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.हे दोन्ही गट काल गुरूवारी सायंकाळच्या सुमारास विसापूर फाटा इथे आमने-सामने आले. त्यानंतर शाब्दिक वाद काही वेळातच हत्येपर्यंत गेला. हल्लेखोरांनी या चारही जणांचा पाठलाग करून हत्या केल्याचं समोर येत आहे. मात्र या चार जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. 

दरम्यान, पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. परंतु या चौघांची हत्या कोणी केली, हत्येपाठीमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.