‘पाच नव्हे तर २५ वर्षे टिकेल सरकार’; शंभूराज देसाईंचा दावा

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पायी वारीला परवानगी दिली असती तर दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीतून संसर्गाचा फैलाव होण्याची भीती होती. त्यामुळेच मर्यादित वारकऱ्यांना वारीसाठी परवानगी दिल्याचे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

    देसाई यांनी नगर येथे आज पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही बसने वारी पंढरपूरला जाणार आहे. सर्व वारकरी संप्रदायातील संघटनांशी, प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. पायी वारीला परवानगी दिली असती तर आजूबाजूच्या गावातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असती. त्यातून संसर्गाचा धोका निर्माण झाला असता. हा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मर्यादित वारकऱ्यांना वाढीसाठी परवानगी दिली असल्याचे ते म्हणाले.

    ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेला राज्यात पायबंद घालण्यासाठी शासन काही निर्णय घेणार आहे का? या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल देत ते मुख्यमंत्री सांगतील, असे सांगत त्या प्रश्नाचा चेंडू मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कोर्टात टोलवला.

    पाच नव्हे २५ वर्षे टिकेल सरकार

    महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असे सांगत पाच नवे तर पुढचे पंचवीस वर्ष महाविकास आघाडी कायम राहील असा दावा मंत्री देसाई यांनी केला.