राहुरी साखर कारखान्याच्या संचालक मंडळास एक वर्षाची मुदतवाढ द्या; डॉ. सुजय विखे-पाटलांची मागणी

    अहमदनगर : राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळास एक वर्षाची मुदतवाढ देऊन पुढील गळीत हंगामासाठी कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने सहकार विभागाने स्पष्टीकरण द्यावे, अशी विंनती खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली.

    विखे यांनी मंत्रालयात बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत जूनमध्ये संपली आहे. कोविडने कोणत्याही सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घ्यायचा नाही, असा निर्णय राज्य सरकारचा आहे. ऑगस्टनंतर याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होणार असल्याने राहुरी कारखान्याच्या समोर पुढील गळीत हंगामाचे मोठे आव्हान उभे असल्याची बाब खासदार विखे यांनी सहकारमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

    गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखान्यात करावी लागणारी काम आणि गुंतवणूक याचे निर्णय करावे लागणार असल्याने संचालक मंडळाच्या बाबतीत सहकार विभागाने योग्य मार्गदर्शन करावे, अशी विनंती लेखी पत्राद्वारे केली असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.