पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘मुंबईला या, निधी देतो’

    अहमदनगर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज नवनिर्वाचित महापौर रोहिणी शेंडगे आणि उपमहापौर गणेश भोसले यांचा सत्कार केला. मुंबईत या, शहर विकासासाठी निधी देतो, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

    पालकमंत्री मुश्रीफ यांनी दोघांचा सत्‍कार करत पुढील वाटचालीस शुभेच्‍छा दिल्‍या. शहर विकासासाठी राज्‍य शासनाकडून मोठा निधी उपलब्‍ध करून दिला जाईल, अशी ग्‍वाही देताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी पुढील आठवड्यात मुंबई येथे येण्‍याचे निमंत्रण दिले. यावेळी आमदार संग्राम जगताप, नगरसेविका पुष्‍पा बोरूडे, माजी महापौर सुरेखा कदम, सुवर्णा गेणप्‍पा, अजिंक्‍य बोरकर, भा कुरेशी, राजेंद्र दळवी, बाळासाहेब जगताप, अनुप काळे, संतोष भोसले, किशोर कानडे उपस्थित होते.

    महापौर रोहिणी शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांनी अमृत योजनेचे भुयारी गटर योजनेच्‍या कामामुळे शहरातील रस्‍ते खोदाई झाल्‍यामुळे रस्‍त्‍यावर खड्डे पडलेले असून, त्‍याचा नागरिकांना त्रास होत आहे. शहरातील रस्‍ते दुरूस्‍ती व नवीन रस्‍ते विकसित करण्‍यासाठी ५ कोटी रूपये निधी मिळण्याबाबत मागणी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली.