शेवगावचे हरीश भारदे यांना शिक्षण क्षेत्रातील मानाचा पुरस्कार; उदय सामंत यांच्या हस्ते होणार सन्मान

    शेवगाव / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शेवगाव येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळ संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हरीश श्यामसुंदर भारदे यांना ‘नवभारत’च्या वतीने दिला जाणारा शिक्षण क्षेत्रातील ‘एक्सलांस इन टीचींग प्रॅक्टीसेस’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

    मुंबईत सोमवारी (30 ऑगस्ट) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. ही संस्था ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्याच्या शैक्षणिक उन्नतीसाठी थोर देशभक्त, स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीवादी नेते पडमभूषण कै. बाळासाहेब भारदे यांनी 1951 मध्ये स्थापन केली. आज ही संस्था त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक विचारांचे महाराष्ट्रातील खरेखुरे स्मारक ठरली आहे.

    संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख सतत उंचावत राहिला असून, या शाळेने सुरू केलेल्या पाचवी सेमी इंगजी , पाचवीपासून संगणक शिक्षण, अप्रगत विद्यार्थ्यांसाठी सुधार योजना अशा उपक्रमांचे नंतर राज्यभर अनुकरण झाले. पुणे विभागीय मंडळात संस्थेचे 12 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून मराठी विषयातील सर्वोच्य गुणांसाठी असलेले राम गणेश गडकरी सुवर्ण पदक पुण्याबाहेर प्रथम नेण्याचा सन्मान संस्थेला मिळालेला आहे.

    आय.ए.एस. डॉ. पुरुषोत्तम भापकर, आय.पी.एस.तेजस्वी सायपुते, आय.पी.एस. चेतन लोढा, कृषी संशोधक डॉ.आदिनाथ काटे, एव्हरेस्ट वीर अविनाश बावणे हे संस्थेचे भूषण असलेले माजी विद्यार्थी असून अनेक प्रथमवर्ग दर्जा असलेले अधिकारी, राष्ट्रीय खेळाडू, कलावंत, प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे राजपथावर संचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे छात्र सैनिक हे संस्थेचे वैभव आहे. आचार्य अत्रे, दिवंगत सदाशिव अमरापूरकर, विकास आमटे, शरद पवार, दिवंगत विलासराव देशमुख, दिवंगत आर.आर.पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी संस्थेला भेट देऊन शैक्षणिक उपक्रमाचा गौरव केला आहे.

    सध्या या संस्थेत 5 हजार विद्यार्थी पहिली ते बारावीचे शिक्षण घेत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व अभिनव शैक्षणिक उपक्रमांसाठी संस्था राज्यात आदर्श ठरली आहे.