गृहमंत्री अनिल देशमुखांचं मंत्रीपद जाईल असं वाटत नाही; बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रीया

महाराष्ट्रातील पोलीस विभाग चांगलं काम करत आहे. कुठे जर चुकीचं होत असेल तर कारवाई झाली पाहिजे. गृहमंत्री अनिल देशमुख योग्य पद्धतीने काम करत आहेत. त्याचं मंत्रीपद जाईल असं मला वाटत नाही अशी प्रतिक्रीया कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

    अहमदनगर : सचिन वाझे प्रकरणावरुन राज्याच्या राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याचं पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांची बदली केली. यावरुन विरोधी पक्षांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. दरम्यान अनिल देशमुखांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पावर यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर अनिल देशमुख राजीनामा देणार अशा चर्चाना उधाणं आलं. याबाबतच्या चर्चा राष्ट्रवादीने खोडून काढल्या असून, काँग्रेसनंही प्रतिक्रिया दिली आहे.

    दरम्यांन बाळासाहेब थोरात यांनी पक्ष संघटनेविषयी घेतलेले निर्णय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रद्द करतील , अशी चर्चा सुरु असताना, त्यावर थोरातांनी भाष्य केलं आहे. नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व आहे. कोणतेही निर्णय घेताना आमच्यात समन्वय आहे. पक्षात कोणताही वाद नसून, सोशल मीडियातून वाद असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे. मात्र असं काही असेल तर आम्ही चर्चेतून प्रश्न सोडवू, असं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे.

    कोरोना रुग्णसंख्या वाढीवर थोरातांचं भाष्य

    कोरोनाने पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. वाढत जाणारा कोरोनाबाधितांचा आकडा काळजीचा विषय झाला आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर आपण निष्काळजी झालो असून, आपल्या कुटुंबाकरता आपण स्वतः काळजी घेणं गरजेचं असल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.