आपल्याला काेणाची ऍलर्जी नाही : जानकर

    राहुरी : आपल्याला कोणत्याही राजकीय नेत्यांची ऍलर्जी नाही अथवा आपण कोणाला बांधिल नाही. आता राष्ट्रीय समाज पक्षात अन्य समाजातील धर्मनिपक्ष लोकं येत आहेत. लोकांच्या हाताला काम पाहिजे व काहींना राम पाहिजे. मात्र, आमच्या घामाला योग्य दाम द्या, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी  केली.

    शिवाजीनगर येथील श्रीकृष्ण गो शाळेचे अध्यक्ष ललित चोरडीया यांना जानकर यांनी सदिच्छा भेट दिली. ते बाेलत हाेते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुधारे, डाॅ. किशोर खेडेकर, डाॅ. हर्षद चोरडीया आदी उपस्थित होते.

    राजकीय लाेकांनी आपण लोकांचे विश्वस्त आहोत, या हेतूने काम केले पाहीजे. सत्ता लोक कल्याणासाठी वापरायची असते. लबाडी व जातीय तेढ निर्माण करून जास्त दिवस सत्ता टिकत नाही, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

    नेत्यांनी लोकांना गुलाम बनविले

    जानकर म्हणाले, छोट्या पक्षाची शिडी घेऊन सत्तेच्या राज गादीवर बसायचे व नंतर पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती झाली आहे.  ग्रामीण भागातील राजकीय नेत्यांनी आपल्या सत्तेच्या माध्यमातून लोकांना गुलाम बनविले आहे. अनेक लोकांवर अन्याय होत आहे. आपण मंत्री असताना दुधाला पाच रुपये भाव वाढ केली होती. किमान दहा रुपये भाव वाढ करायला हवी. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करायची असेल तर दुध दर वाढ गरजेची आहे, असे ते म्हणाले.