मास्कशिवाय ग्राहक आढळल्यास दुकान होणार ‘सील’! ; संगमनेरच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकार्‍यांचे ‘सक्तीचे’ आदेश

फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. त्यातही जिल्ह्यातील अहमदनगर, राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर व राहाता तालुक्यात झपाट्याने रुग्णवाढ होत असल्याने येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व अधिकार्‍यांना आवश्यक सूचना देण्यासाठी जिल्हाधिकारी भोसले बैठका घेत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवार दिनांक १९ मार्च रोजी त्यांनी संगमनेरला भेट देत पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात अधिकार्‍यांसमवेत संगमनेर तालुक्यातील कोविड स्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना केल्या.

    संगमनेर : नागरिकांकडूल कोविड नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा परिणाम जिल्ह्यातील कोविडचा प्रादुर्भाव वाढण्यात झाला असून प्रशासनाला पुन्हा पूर्ण ताकदीने सक्रीय होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तिंचा शोध घेवून त्यांना समाजापासून विलग करण्याची प्रक्रीया अत्यंत महत्त्वाची असून त्याबाबत सक्तिचे आदेश देण्यात आले आहेत. यापुढे ज्या दुकानात अथवा मंगल कार्यालयात मास्कशिवाय लोकांची उपस्थिती आढळल्यास ती ठिकाणं महिनाभर सिल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेर येथे दिली.

    फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. त्यातही जिल्ह्यातील अहमदनगर, राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर व राहाता तालुक्यात झपाट्याने रुग्णवाढ होत असल्याने येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व अधिकार्‍यांना आवश्यक सूचना देण्यासाठी जिल्हाधिकारी भोसले बैठका घेत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवार दिनांक १९ मार्च रोजी त्यांनी संगमनेरला भेट देत पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात अधिकार्‍यांसमवेत संगमनेर तालुक्यातील कोविड स्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना केल्या.

    यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.सुरेश शिंदे, तहसीलदार अमोल निकम, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राजकुमार जर्‍हाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप, मुख्याधिकारी डॉ सचिन बांगर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया, डॉ.सीमा घोगरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकूंद देशमुख, तालुका निरीक्षक पांडूरंग पवार, घारगावचे निरीक्षक सुनील पाटील, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल आदी अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी पोलिसांना सक्तिने कारवाई करण्याचे आदेश देतांना कोणतीही हाईगई न करता मास्क शिवाय फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. कोविडचा प्रादुर्भाव वाढलेला असतांनाही विवाह समारंभांना मोठी गर्दी होत आहे, तसेच अनेक दुकानांमध्ये कोविडच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आल्याने मास्कशिवाय दुकानदार अथवा ग्राहक आढळल्यास तसेच मंगल कार्यालयांमध्येही मास्कशिवाय कोणी दिसल्यास अशी ठिकाणी महिनाभर सिल करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.