जामखेडमध्ये भिलवाडा पॅटर्न राबवा : राम शिंदे

अहमदनगर : जामखेड शहरातील करोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता बारामतीप्रमाणे एकच रुग्ण आढळून आल्यानंतर त्या ठिकाणी भिलवाडा पॅटर्न राबवून बारामतीला करोनामुक्‍त करण्याचा प्रयत्न होत आहे.

 अहमदनगर :  जामखेड शहरातील करोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता बारामतीप्रमाणे एकच रुग्ण आढळून आल्यानंतर त्या ठिकाणी भिलवाडा पॅटर्न राबवून बारामतीला करोनामुक्‍त करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याप्रमाणे जामखेडमध्येही करोनाचे रुग्ण वाढत असून ही संख्या ११ वर गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने जामखेडमध्ये भिलवाडा पॅटर्न राबवावा, अशी मागणी माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.

प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात प्रा. शिंदे म्हणाले, नगर जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु होऊन एक महिना पूर्ण झाला. संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रशासनाने केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनाचे पालन करीत ही महामारी नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. मात्र जामखेड, नगर शहर, संगमनेर, नेवासा इत्यादी ठिकाणी पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने ती ठिकाणे हॉटस्पॉट म्हणुन जाहीर केले. जामखेड वगळता इतर ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आली, परंतु जामखेडमध्ये आणखी दोन रुग्ण वाढले. त्यामुळे जामखेडमध्ये करोना बाधितांची संख्या ११ वर गेली आहे. हे ऐकुन माझे मन खुप सुन्न झाले. रात्रभर झोप आली नाही, त्यामुळे भिलवाडा पॅटर्न राबवून रूग्णांची संख्या पूर्णपणे नियंत्रणात आणता येवू शकते. जामखेडमध्ये भिलवाडा पॅटर्न राबवण्याची नितांत गरज आहे.शासनाने व प्रशासनाने निर्णय घेऊन त्वरित अंमलबजावणी करावी अशी विनंती त्यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
-उपमुख्यमंत्र्यांनी जामखेडकडे लक्ष द्यावे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये जसे लक्ष घालून तातडीने बारामतीमध्ये भिलवाडा पॅटर्न लागू करून करोना नियंत्रणात आणला, तसे जामखेड शहरात लक्ष घालून जामखेडमध्ये भिलवाडा पॅटर्न लागू करावा, असे शिंदे यांना अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्याचेही या निवेदनातून स्पष्ट होते.