जिल्हा परिषदेच्या ऑफलाईन महासभेतच सदस्यांनी काढले वाभाडे

    अहमदनगर/संदीप रोडे : कोरोना संकटानंतर दीड वर्षांनी आज (दि. १४) रोजी झालेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ऑफलाईन महासभेत सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे वाभाडे काढले. विषय पत्रिका आरोग्य घरभाडे या विषयासह सदस्यांनी प्रशासनाला कात्रीत पकडत निष्क्रियता समोर आणली.

    राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली आज अहमदनगर जिल्हा परिषदेची महासभा पार पडली. या सभेमध्ये जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, हर्षदा काकडे, लोखंडे यांनी जिल्हा परिषदेच्या निष्क्रिय कारभारावर बोट ठेवले. यापूर्वी झालेल्या ऑनलाईन सभेतील विषय अवलोकनार्थ ठेवले गेले नाहीत. स्थगित केलेले विषयी घेतले नाहीत. यावरून राजेश परजणे यांनी विषय सूचीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजेश परजणे यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिशाभूल करणारी उत्तरे प्रशासनाने दिल्याने त्यांनी प्रशासनाच्या खुलाशाची चिरफाड केली. जिल्हा परिषदेचे पंधरा हजार २६० कर्मचारी घरभाडे घेतात. केवळ ४२ कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाही, असे लेखी उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.

    चुकीची आकडेवारी दिल्याचे सांगत अर्जन यांनी प्रशासनाचा निष्क्रिय समोर मांडला. खाते प्रमुखांकडून लेखी अहवाल घेतला त्यानंतरच माहिती दिली, अशी सारवासारव प्रशासनाकडून करण्यात आली. जालिंदर वाकचौरे यांनी आरोग्याच्या प्रश्नावर प्रशासनाची बोलती बंद केली.

    भाडोत्री घर मालकांना व्यवसायिक कर

    गाव पातळीवर शासकीय कर्मचाऱ्यांना भाडोत्री घर देणाऱ्या मालकांकडून व्यावसायिक दराने ग्रामपंचायतीने कर आकारणी करावी, अशी मागणी राजेश परजणे यांनी केली. उत्पन्न वाढून ग्रामपंचायत सक्षम होईल, असे सांगत त्यांनी जिल्हा प्रशासनाने याबाबत कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाला दिले.