ऐन पावसाळ्यात गावे तहानलेलीच ; नगर तालुक्यातील परिस्थिती, ८ गावात टँकरची मागणी

पावसाने दडी मारल्याने ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु असल्याचे विदारक चित्र तालुक्यातील काही गावांमध्ये दिसून येत आहे. बहिरवाडी, ससेवाडी, इमामपुर, मदडगाव, दशमी गव्हाण, काळेवाडी, कोल्हेवाडी, सांडवे या गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केली आहे.

  नगर तालुका : नगर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून तालुक्यातील ८ गावांनी पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे. नगर तालुक्यातील काही भागात मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पावसाळ्याच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या पावसाच्या ओलीवर तालुक्यात सरासरी ३५ टक्के पेरण्या झाल्या. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

  पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
  पावसाने दडी मारल्याने ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु असल्याचे विदारक चित्र तालुक्यातील काही गावांमध्ये दिसून येत आहे. बहिरवाडी, ससेवाडी, इमामपुर, मदडगाव, दशमी गव्हाण, काळेवाडी, कोल्हेवाडी, सांडवे या गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केली आहे.

  उपलब्ध पाण्याचे स्रोत कोरडेच
  तालुक्यातील दक्षिण भागात वाळकी मंडलात सर्वाधिक पाऊस झाला असून पूर्व व उत्तर भागातील जेऊर मंडलात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम पट्ट्यात ही पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. रोहिणी, मृग, आद्रा नक्षत्रात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कमी पर्जन्यमानामुळे भुजल पातळीत वाढ झाली नाही. उपलब्ध पाण्याचे स्रोत कोरडेच आहेत. विहीर, तलाव, हातपंप कोरडेच आहेत. ऐन पावसाळ्यात गावे तहानलेलीच असल्याचे विदारक चित्र तालुक्यात पाहवयास मिळत आहे.

  इमामपूर गावाच्या चोहो बाजूंनी डोंगररांगा असल्याने पावसाळ्यात भूजल पातळीत लवकर वाढ होते. तर उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते. चालू वर्षी पाऊस झाला नसल्याने पाण्याचे सर्व स्रोत बंद आहेत. त्यामुळे टँकर सुरू करणे गरजेचे आहे.

  -भिमराज मोकाटे, सरपंच, इमामपुर

  मान्सून पूर्व झालेल्या पावसाच्या ओलीवर बाजरी, मुग, सोयाबीनची पेरणी केली आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने खरीप पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची वेळ येईल. परिणामी शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडणार आहे.
  – कारभारी कर्डिले, शेतकरी, मजले चिंचोली

  -तालुक्यातील मंडलनिहाय पाऊस

  नारेगाव १०३.४,सावेडी ९२.६, कापुरवाडी १२७.३, केडगाव ९९.७, भिंगार ९९.३, नागापूर २०२.८, जेऊर ८७.८, चिचोंडी ९९.३, वाळकी १५६.८, चास १०५.८, रुई छत्तीसी १०२, नगर ११६.३ मिमी.