शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन भूसंपादन करावे;  जनआधार आंदोलन संघटनेचे आंदोलन

अहमदनगर : जायकवाडी जलाशयातील अतिरिक्त पाण्यामुळे दहिफळ (ता. शेवगाव) येथील शेतकर्‍यांच्या शेतामध्ये पाणी घुसून झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी व प्रलंबीत भूसंपादनाची कारवाई पुर्ण करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली.

 अहमदनगर : जायकवाडी जलाशयातील अतिरिक्त पाण्यामुळे दहिफळ (ता. शेवगाव) येथील शेतकर्‍यांच्या शेतामध्ये पाणी घुसून झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी व प्रलंबीत भूसंपादनाची कारवाई पुर्ण करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, महेश भोसले, गोरख ढाकणे, वजीर सय्यद, गणेश निमसे, शिवाजी जायभाय, जब्बार शेख, गोरख बडे आदी उपस्थित होते.

                आठ महिन्यापुर्वी जायकवाडी जलाशय शंभर टक्के भरल्याने त्याचे अतिरिक्त पाणी दहिफळ येथील शेतकर्‍यांच्या शेतामध्ये गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी अधीक्षक अभियंता जायकवाडी प्रकल्प मंडळ औरंगाबाद विभागाला नुकसान भरपाई व भूसंपादनाची मागणी केली होती. तरी संबंधित विभागाकडून आठ महिन्यापुर्वी सदर जमिनीचे पंचनामे व रंगीत नकाशे तयार करण्यात आले. मात्र यानंतर पुढे कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. या भागातील शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह पुर्णत: शेतीवर अवलंबून असून, या त्रासामुळे जीवन जगणे अवघड झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी. जायकवाडी जलाशयाचे पाणी हे बुडीत क्षेत्र तसेच संपादित क्षेत्र बाहेर जात असल्याने तेथे आपल्या कार्यालयामार्फत पुनर्वसन व भूसंपादनाची कार्यवाही करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रश्‍नी कार्यवाही न झाल्यास स्थानिक शेतकरी १३ जुलै रोजी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.