जीपीएस लोकेशन आलं कामी; दारूचा टेम्पो लुटणाऱ्या टोळीला अटक

  अहमदनगर : औरंगाबाद येथून कोल्हापूरकडे विदेशी दारू घेऊन निघालेला टेम्पो लुटणाऱ्या टोळीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटकेतील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्वप्नील उर्फ भूषण सुनिल गोसावी (सिन्नर), संतोष उर्फ खरात ( सटाणा, जि.नाशिक), कुलदिप उर्फ गणेश मनोहर कापसे (अश्वमेघ कॉलनी , नाशिक), भारत सिताराम सुतार (आंबेडकरनगर ,ओझर,नाशिक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पाळत ठेवून पाठलाग त्याला अडवून लुटमार करायची अशी या सराईत गुन्हेगारांच्या टोळीची पद्धती होती. २८ मेच्या रात्री औरंगाबाद येथून विदेशी दारूचे बॉक्स घेऊन निघालेला टेम्पो (एमएच – १४, डीएम -०८००) या आरोपींनी नगर जवळील इमामपूर घाटात कार आडवी घालत थांबविला. टेम्पोचालक अन्सार हसन पठाण  (माणिक दौंडी, ता.पाथर्डी), क्लिनर अमोल काळे यांना मारहाण करत छऱ्याचे बंदुकीचा धाक दाखवून टेम्पोमधील दारुचे बॉक्स व काळेचा मोबाईल असा १० लाख ३० हजार ७९१ रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला.

  लोकेशनवरून माहिती

  अन्वर पठाण यांनी या घटनेची माहिती पोलीस कंट्रोल रूमला दिली. चोरीस गेलेल्या टेम्पोस असलेल्या जीपीएस प्रणालीवरुन टेम्पोचे लोकेशन घेतले असता तो नगर-मनमाड रोडने मनमाडचे दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. आरोपींनी चिंचोली फाटा येथे दारुसह टेम्पो सोडून पसार झाले होते. पसार झालेल्या आरोपींची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यांनी पथक स्थापन करत एकएका आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

  रेकॉर्डवरील गुन्हेगार

  पकडलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरुद्ध यापूर्वी जबरी चोरी, घरफोडी यांसारखे गुन्हे दाखल आहेत. आरोपी स्वप्नील उर्फ भुषण सुनिल गोसावी याचे विरुध्द सिन्नर, ओझर येथे तर आरोपी संतोष उर्फ बापू पंडीत खरात याचे विरुध्द ओझर, मालेगांव तालुका, जायखेडा, जुन्नर, चांदवड, आणि भारत सिताराम सुतार याच्याविरुध्द ओझरला दोन, आरोपी कुलदिप उर्फ गणेश मनोहर कापसे याचे विरुध्द मसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. एसपी मनोज पाटील, एएसपी सौरभ अग्रवाल, डीवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने या टोळीच्या मुसक्या आवळल्या.