ऐनसणासुदीच्या काळात ‘इथं’ लॉकडाऊन; बाजारपेठाही ‘लॉक’

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी तालुक्यातील चार गावांमध्ये टाळेबंदी (Lockdown in Parner) लागू केली. सोमवारपासून सहा गावांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

    पारनेर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी तालुक्यातील चार गावांमध्ये टाळेबंदी (Lockdown in Parner) लागू केली. सोमवारपासून सहा गावांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण दहा गावांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

    यात टाकळी ढोकेश्वर, निघोज, अळकुटी, भाळवणी या बाजारपेठांच्या गावांचा समावेश आहे. नवरात्र उत्सव,दसरा या सण-उत्सवाच्या काळात तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्रमुख बाजारपेठांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आल्याने व्यापाऱ्यांसह नागरिक हैराण झाले आहेत. सध्या टाळेबंदी लागू असलेल्या गावांपैकी भाळवणी, कान्हूर पठार या गावांमध्ये २३ सप्टेंबर ते ३ आक्टोबर या कालावधीत १० दिवस टाळेबंदी होती. पुन्हा १० दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आल्याने सलग वीस दिवस व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत तर व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

    शेतकरी , हॉटेलचालकांचे नुकसान

    आज भाळवणी, निघोज, टाकळी ढोकेश्वर येथील आठवडे बाजार असल्याने व्यापाऱ्यांनी, हॉटेल व्यावसायिकांनी तयारी करून ठेवली होती. परिसरातील शेतकरी फळे, भाजीपाला व इतर शेतीमाल घेऊन बाजारात आले होते. मात्र, महसूल प्रशासनाने सकाळी दहा वाजता अचानक टाळेबंदी आदेश लागू केल्याने शेतकऱ्यांचे, हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.