रेखा जरे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, प्रेमसंबंध लपवण्यासाठी रचला गेला सगळा डाव ?

आरोपी पत्रकार बाळ बोठे आणि रेखा जरे(Rekha Jare Murder Case) यांच्यात प्रेमसंबंध(Love Connection) सुरू होते, असा खुलासा दोषारोपपत्रात केला आहे. बदनामी होण्याच्या भीतीने बाळ बोठे याने रेखा जरे यांची हत्या घडवून आल्याचं दोषारोपपत्रात म्हटलं आहे.

    अहमदनगर: सामाजिक कार्यकर्त्या आणि यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील (Rekha jare murder case) मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe) याला काही दिवसांपूर्वी नगर पोलिसांनी अटक केली आहे. बोठे याची चौकशी केल्यानंतर नगर पोलिसांनी आज पुरवणी दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात दाखल (Chargesheet filed ) केलं आहे. या दोषारोपपत्रात पोलिसांनी हत्येच्या मुळ कारणांचा खुलासा केला आहे.

    आरोपी पत्रकार बाळ बोठे आणि रेखा जरे यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते, असा खुलासा दोषारोपपत्रात केला आहे. बदनामी होण्याच्या भीतीने बाळ बोठे याने रेखा जरे यांची हत्या घडवून आल्याचं दोषारोपपत्रात म्हटलं आहे. त्यामुळे रेखा जरे हत्या प्रकरणाला वेगळ वळणं लागलं आहे. आरोपी बाळ बोठे सध्या न्यायालयीन कोठडीत असून पारनेर तुरुंगात शिक्षा भोगत आहे. रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीलाच ५ आरोपींना अटक केली होती.

    मुख्य आरोपी बाळ बोठे याला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. खरंतर रेखा जरे हत्या प्रकरणात यापूर्वीच एक दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. पण बाळ बोठे याला अटक केल्यानंतर आणखी एक ४५० पानांच पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. बाळ बोठे याने चौकशीत रेखा जरे यांच्यासोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याची कबुली दिली आहे. बदनामीच्या भीतीतून हत्या घडवून आणल्याचं सांगितलं आहे. आज दुसरे ४५० पानांचं पुरवणी दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे.

    या दोषारोपपत्रात मुख्य आरोपी बोठे याच्यासह त्याला मदत करणार्‍या अन्य सहा जणांवर विविध आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर यामध्ये आरोपींचे कबुली जबाब, साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक विश्लेषणाची कागदपत्रं आणि हत्येप्रकरणात मिळालेल्या पुराव्याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. बोठेचा आयफोन प्रयोग शाळेतून तपासून आल्यानंतर आणखी काही पुरावे या दोषारोपपत्रात नमूद केले जातील, अशी माहितीही तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.