अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीची सत्ता; भाजप सत्तेपासून दूरच

    अहमदनगर : उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी संजय शेंडगे व उपमहापौर पदी राष्ट्रवादीचे गणेश भाेसले यांची बिनविरोध निवडीची घोषणा पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भाेसले यांनी केली. भाेसले यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता पदाधिकारी निवडीची सभा सुरू झाली. यावेळी आयुक्त शंकर गोरे, नगरसचिव एस. बी. तडवी उपस्थित होते. सभागृहात रोहिणी शेंडगे व गणेश भाेसले प्रत्यक्षात उपस्थित होते.

    अन्य नगरसेवक ऑनलाइन पध्दतीने सभेस उपस्थित होते. छाननीत दोघांचेही अर्ज वैध ठरले. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आली. त्यानंतर ११.३५ वाजता महापौरपदी शेंडगे तर उपमहापौरपदी भाेसले यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा पीठासीन अधिकारी भाेसले यांनी केली. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.

    २४ तास पाणी व हॉस्पिटल

    नगर शहराला २४ तास पाणी व महापालिकेचे स्वतंत्र ५०० बेडचे हॉस्पिटल बांधण्याचा संकल्प आहे. प्रलंबित प्रश्न आणि भुयारी गटार, अमृत योजना, फेज २ पाणी योजना, पथदिवे हे प्रश्न मार्गी लावले जातील, असे नवनिर्वाचित महापौर रोहिणी शेंडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांिगतले. उपमहापौर गणेश भाेसले यांनी शहर हरित करण्यासोबतच कर्मचाऱ्यांना शिस्त व प्रलंबित योजना पूर्ण करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

    पहिल्यांदाच जल्लोषाविना निवडणूक

    महापालिकेच्या इतिहासात पहिल्यादांच कोणताही जल्लोष न करता ही निवडणूक शांतेत पार पडली. निवड प्रसंगी नगरसेवक, त्यांंचा एकाही समर्थक बाहेर आवारात उपस्थित नव्हता. निवडीनंतर शिवसेनेने शहरात फटाके फोडत जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत ग्रामदैवत विशाल गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर शिवालय येथे शिवसेनेने जल्लोष केला. महापालिका आवारात पोलीस बंदोबस्त असल्याने कोणालाही प्रवेश दिला गेला नाही.