बाजार समितीतील गैरव्यवहार उघड; महाविकास आघाडीचा आरोप

    जेऊर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कथित गैरव्यवहाराबाबत महाविकास आघाडीने पणन संचालकांकडे दाद मागितली होती. त्यावर एस. डी. सुर्यवंशी आणि गणेश पुरी चौकशी समितीने दिलेल्या अहवालावरून नगर बाजार समितीला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडून ८ सप्टेंबरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बाजार समितीमधील भ्रष्ट कारभार उघड झाल्याची टीका महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

    नगर तालुका महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत बाजार समितीला मिळालेल्या कारणे दाखवा नोटीसवरून बाजार समितीत मोठे आर्थिक घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे. या पत्रकार परिषदेवेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, गोविंद मोकटे, पंचायत समिती सभापती संदीप गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी सभापती रामदास भोर, गुलाब शिंदे, विठ्ठल काळे, तालुका प्रमुख राजू भगत, राष्ट्रवादीचे केशव बेरड आदी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना संदेश कार्ले म्हणाले की, महाविकास आघाडीने आजवर वेळोवेळी केलेल्या मागणीच्या आधारे शासनाने चौकशी केली. चौकशीमध्ये अनेक ठिकाणी करोडो रुपयांची अनियमितता आढळून आलेली आहे. चौकशीसाठी समितीला बाजार समितीने अपूर्ण कागदपत्रे दिली, मासिक सभांना हजर नसताना प्रवास भत्ता घेतला गेला.

    अनधिकृत बांधकामे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांसह अनेक मुद्यांमध्ये घोटाळे झाल्याचे चौकशी समितीला आढळून आले आहे. बाजार समिती आर्थिक डबघाईला आलेली आहे. सर्व रकमा या वसुलीस पात्र आहेत. दूध संघाचे वाटोळे केले तसे बाजार समितीचे होऊ नये म्हणून शेतकरी हितासाठी आम्ही हे सगळे करत आहोत. 50 कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार झाला असून पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे चक्र यांचे सुरू आहे. संचालक मंडळ लवकरच जेलमध्ये जाईल, असे गोविंद मोकाटे म्हणाले.

    बाळासाहेब हराळ यांनी पाच वर्षाचे स्पेशल ऑडीट शासनाने करावे म्हणजे अनेक गंभीर प्रकार समोर येतील. बाजार समितीने चौकशी समितीला कागदपत्रे पण उपलब्ध करून दिली नाहीत. ती का दिली नाहीत याचे संशोधन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच स्पेशल ऑडीटची मागणी आम्ही शासनाकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.