कुख्यात गुन्हेगार संदीप भोसले टोळीविरूध्द ‘मोक्का’

    नगर तालुका : जिल्ह्यात संघटीपणे गुन्हे करणार्‍या संदीप ईश्‍वर भोसले व त्याच्या टोळीतील चार सदस्यांविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. मिलन उर्फ मिलिंद ईश्‍वर भोसले, संदीप ईश्‍वर भोसले (टोळीप्रमुख), मटक्या उर्फ नारायण ईश्‍वर भोसले, जमाल उर्फ पल्या ईश्‍वर भोसले, अटल्या उर्फ अतुल उर्फ योगेश ईश्‍वर भोसले (सर्व रा. बेलगाव, ता. कर्जत) अशी आरोपींची नावे आहेत.

    जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलित करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळ्या आहेत. त्यांच्याविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचे संकेत दिले होते. पारनेर पोलिस स्टेशन येथे भादंवि कलम 395 प्रमाणे 11 जून 2021 रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा संदीप ईश्‍वर भोसले व त्याच्या टोळीने संघटीतपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर टोळीविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याकरीता पारनेर पोलिस ठाण्याकडून मोक्काचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.

    या टोळीविरूध्द नगर, कर्जत, पारनेर, पाथर्डी, जामखेड, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या टोळींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्पष्ट केले.