पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याप्रकरणाला नवे वळण , भूखंडाच्या वादातून राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा असल्याचा आरोप

पत्रकार दातीर यांनी राहुरी शहरातील महत्वाच्या ठिकाणी असलेल्या १८ एकरच्या या भूखंडाच्या खरेदी विक्री व ताब्याबाबत वेळोवेळी उपोषण केले होते. न्यायालयातही गेले होते. तसेच बातम्यांच्या माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावाही केला होता. या गुन्हयातील संशयित आरोपी कान्हू गंगाराम मोरेला राजकीय पाठबळ असल्याची शक्यता असून यापूर्वी संशयित आरोपी कान्हू मोरे याच्यावर ३०२ सारखे गंभीर गुन्हयांची नोंद आहे.

    राहूरी : पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या ज्या भूखंडाच्या वादातून झाली तो भूखंड राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार माजी राज्यमंत्री शिवाजी कार्डिले यांनी केला आहे. कार्डिले यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली असून त्यामुळे मविआ सरकारचे आणखी एक मंत्री तनपुरे अडचणीत आले आहेत.

    पोलिस अधीक्षकाना दिले निवेदन

    राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांना ६ एप्रिल रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी माळी नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याने दातीर यांच्या हत्येची कबुलीही दिली आहे. तसेच तनपुरे यांच्या कंपनीच्या भूखंडाच्या वादातूनच हत्या करण्यात आल्याची कबुली या संशयित आरोपीने दिल्याची माहिती शिवाजी कार्डिले यांनी दिली. कार्डिले यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.

    पोलिस संरक्षणाची केली होती मागणी

    पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांचे ६ एप्रिल रोजी राहुरी येथील मल्हारवाडी रोडवरुन दिवसा ढवळया अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची अमानुषपणे हत्या करून त्यांचा मृतदेह शहरातील कॉलेजरोड परिसरात आणून टाकण्यात आला. मयत दातीर यांना यापूर्वी जीवे मारण्याची धमकी देणे, हल्ला करणे असे प्रकार घडले होते या बाबत दातीर यांनी राहुरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच आपल्या जीवितास धोका असल्याने पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी ही केली होती, असे कार्डिले यांनी म्हटले आहे.

    जागा बळकावण्याचे काम

    अटक करण्यात आलेल्या आरोपीने दिलेल्या कबुली जबाबात राहुरी लगतच्या भूखंडाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या १८ एकर भूखंडाच्या उताऱ्यावर ज्यांची ज्यांची नावे आहेत, त्यांच्यावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा. तनपुरे कुटुंब हे नगरपालिकेच्या माध्यमातून जागांवर आरक्षण टाकून जागा बळकावण्याचे काम करत आहे. आधी भूखंडावर आरक्षण टाकायचे, नंतर तो भूखंड विकत घेऊन नंतर त्यावरचे आरक्षण उठवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप करतानाच या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे याला अटक केल्यास या कटामागील मुख्य सूत्रधारांचा तपास लागेल, असे कर्डिले यानी सांगितले.

    प्रकरणाचा केला होता पाठपुरावा

    पत्रकार दातीर यांनी राहुरी शहरातील महत्वाच्या ठिकाणी असलेल्या १८ एकरच्या या भूखंडाच्या खरेदी विक्री व ताब्याबाबत वेळोवेळी उपोषण केले होते. न्यायालयातही गेले होते. तसेच बातम्यांच्या माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावाही केला होता. या गुन्हयातील संशयित आरोपी कान्हू गंगाराम मोरेला राजकीय पाठबळ असल्याची शक्यता असून यापूर्वी संशयित आरोपी कान्हू मोरे याच्यावर ३०२ सारखे गंभीर गुन्हयांची नोंद आहे. त्यावेळी घडलेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावे, या प्रकरणी दातीर यांनी मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात वेगवेगळया याचिका दाखल केलेल्या आहेत. त्याबाबत चौकशी व्हावी, वादग्रस्त १८ एकर क्षेत्रावरील मालकी हक्क असणाऱ्या संबधित व्यक्तींचाही दातीर हत्याप्रकरणात सहभाग असल्याने त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी कर्डिले यांनी केली.

    देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन

    याबाबत महत्वाचे पुरावे व कागदपत्र उपलब्ध असून तपास कामी मागणी केल्यास सादर करण्यात येतील. या गुन्ह्यातील सहभागी असलेल्या सर्वाचा सखोल तपास करण्यात यावा. सर्व आरोपीना अटक करावी व त्यांना कठोर शासन व्हावे, अन्यथा तीव्र स्वरूपांचे आदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत दातीर कुटुंबांना संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली. सोहम ट्रान्सपोर्ट कंपनी असा बोर्ड भुखंडाच्या ठिकाणी आहे. ही कंपनी तनपुरे यांच्या मुलाच्या नावे असल्याचे आढळून येते. त्यामुळेच दातीर यांची हत्या झाली असावी, असा संशय असून या प्रकरणातील सर्वांची कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

    देशमुख हा तनपुरेंचा मेव्हणा आहे. त्याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबतचे एक निवेदन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा निवेदन देणार असून त्यांनाही या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षकांना निवेदन देतेवेळी कार्डिले यांच्यासोबत शरद बाचकर, नानासाहेब जुधारे, अनिल दौंड, आरिफ बागवान, गणेश खैरे, बाबासाहेब शिंदे, नवनाथ कोळसे, बबन कोळसे, अविनाश बाचकर, प्रभाकर हरिष्चंद्रे, शरद उदावंत, नारायण धोंगडे तसेच आदी उपस्थित होते.