आमदार रोहित पवार म्हणाले, ‘भाजप नेत्यांची कुंडली तपासा’

    अहमदनगर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य राज्यातील समस्त महिलांचा अपमान करणारे असून, हीच भाजपची विचारसरणी, संस्कृती आहे का? असा सवाल करतानाच आता त्यावर विरोधी पक्षनेते यांनीच काय ते बोलावे. पंतप्रधान मोदींपासून ते भाजपच्या अनेक नेत्यांसोबत अनेक ‘उद्योगींचे’ फोटो आहेत. त्याचीही चौकशी करून कुंडली बाहेर काढली पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले.

    आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘रात गेली हिशेबात अन् पोरगं नाही नशीबात’ अशी टीका शरद पवार यांच्यावर केली होती. त्याला आज पवारांनी अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले. रोहित पवार म्हणाले, पडळकरांची ही भाषा सामान्य आणि श्रीमंत अशा सर्वच वर्गातील महिलांना न रुचणारी आहे. यातून त्याची विचारसरणी कळते. भाजप नेते देवेंद फडणवीस त्यावर काहीच बोलत नाहीत. त्याअर्थी हीच भाजपचीही हीच विचारसरणी असल्याचे सांगत ही संस्कृती चांगली नसल्याने पवार म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच पडळकर यांनी केलेले वक्तव्य तपासून त्यावर चांगली, वाईट प्रतिक्रिया द्यायला हवी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

    पडळकर यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या कार्यकर्ताचा पवार यांच्यासोबत असलेला फोटो पडळकर यांनी ट्विट केला आहे. त्यासंदर्भात पवार म्हणाले, गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेकांचे फोटो आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असतानाही त्यांच्यासोबतचे अनेकांनी काढलेले फोटो चर्चेत आले होते. भाजपकडे सीबीआयसारख्या तपास यंत्रणा आहेत. त्यांनीच भाजप नेत्यांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या फोटोची चौकशी करून कुंडली बाहेर काढावी, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.

    आरक्षण प्रश्नावर भाजपचे राजकारण

    ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपचे आंदोलन हे फक्त राजकीय हेतूने प्रेरित आहे. ओबीसी आरक्षणाच्या व इतर समाजाच्या हिताचे भाजपला काही घेणे-देणे नाही. त्याचे राजकारण करून ते राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा त्यांना मिळविता आला नाही. आता सत्ता द्या आरक्षण देतो, असे म्हणतात. सत्ता मिळाली तरच ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देणार का? असा सवाल आमदार पवार यांनी फडणवीस यांना केला.