कोरोना रोखणारा घुलेवाडीचा आधुनिक अवलिया…

    मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 18 मार्च 2020 रोजी पहिला लाॅकडाऊन पडला होता. अनेक लोकांना कोरोना झाला त्यातुन काही बरे झालेतर काहींचा दुदैवी मृत्युही झाला. आज पण महाराष्ट्रात व देशात तीच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

    सध्या कोरोनाची दुसरी लाट सूरू असून यांमुळे अनेक जणांना कोरोनाची लागण होत आहे. रूग्णालयांमध्ये ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण होत आहे. कोरोनावर उपाय म्हणून रेमडीसिवरचाही तुटवडा जाणवतो आहे. अशा परिस्थितीत आपणच आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने वस्तुस्थिती ओळखुन कोरोनाला गांभीर्याने घेणे खुप गरजेचे आहे.

    दरम्यानच्या काळात लग्न, वाढदिवस, अंत्यविधी, दहावे इ.मुळे कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी जागा मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. घुलेवाडी ग्रामपंचायत ही अहमदनगर जिल्ह्यातील सर्वांत मोठी लोकसंख्या असलेले ग्रामपंचायत आहे. या गावामध्येही कोरोनाचे अनेक रूग्ण आहेत. कोरोनामुळे अनेक रूग्ण दगावत आहेत. अशा रूग्णांच्या अंत्यविधीवेळी कुटुंबीय, नातेवाईक, सोयरे, मित्र परिवार आवश्यक त्या पद्धतीने काळजी घेत नाहीत, त्यामुळे कोरोना वाढतो आहे. ह्याच गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन घुलेवाडी येथील उच्चशिक्षित बाळासाहेब रामचंद्र राऊत हे स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर अंत्यविधीसाठी येणाऱ्या – जाणाऱ्यांवर स्व खर्चाने सॅनिटायझरची फवारणी करतात व कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सुचनाही त्यांना देतात. त्यांचे हे अविरत कार्य, कोरोनाचे संकट आल्यापासून आजपर्यंत सुरूच आहे. बाळासाहेब राऊत यांनी घुलेवाडी ग्रामपंचायतीचे सलग 15 वर्ष सदस्यपद भूषविले आहे. याचबरोबर घुलेवाडी येथील मथुराबाई थोरात कन्या विद्यालयाचे ते संस्थापक आहे.

    गावातील लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोरोना किंवा इतर संबंधित आजारानी मृत्यु झालेल्यांच्या अंत्यविधीवेळी बाळासाहेब रामचंद्र राऊत यांनी सॅनिटायझरची फवारणी केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठी मदत होत आहे. यांमुळे समाजाला व तरूणांना एक वेगळा संदेश व शिकवण मिळत आहे. त्यांच्या या कामातून प्रत्येकाने प्रेरणा घेणे गरजेचे आहे. बाळासाहेब राऊत यांच्या या कामाचा घुलेवाडी ग्रामस्थ व तालुक्यातील जनतेला सार्थ अभिमान आहे.