केळी पिकाच्या मूल्यवृध्दीसाठी अधिक संशोधन होणे गरजेचे : कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा 

अहमदनगर: महाराष्ट्रामध्ये ८० हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. त्यापैकी ४१ हजार हेक्टर क्षेत्र एकट्या जळगाव जिल्ह्यात असून तेथील केळीची उत्पादकता देशामध्ये सर्वात जास्त म्हण जे ५५ टनापर्यंत आहे.

केळी पिकातील निर्यातीचे प्रमाण अर्धा टक्क्यापर्यत असून ते एक टक्क्यापर्यंत जरी वाढले तरी केळी उत्पादक शेतकर्‍यांना त्याचा मोठा फायदा होईल. केळी पिकामध्ये मुल्यवर्धनाबरोबरच खोडाचा उपयोग टेक्सटाईल तसेच करन्सी नोटांच्या छपाईमध्ये लागणार्‍या कागदासाठी करणे यावर संशोधन होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.के.पी.विश्वनाथा यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, कृषि विभाग,जळगाव,केळी संशोधन केंद्र,जळगाव,कृषि विज्ञान केंद्र,पाल व कृषि विज्ञान केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी, कृषि सहाय्यक व कृषि अधिकारी यांच्या साठी एक दिवसीय केळी पिकावरील किड रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन रावेर विधानसभा मतदार संघाचे आ.शिरीष चौधरी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ.शरद गडाख,निम्नस्तर शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.श्रीमंत रणपिसे, डॉ.तानाजी नरुटे, डॉ.सी.एस.पाटील, संभाजी ठाकुर,उपसंचालक अनिल भोकरे व गुगळे बायोटेकचे संचालक कृषिभुषण रविंद्र कडलग उपस्थित होते.

-शेतकर्‍यांचे प्रबोधन होणे गरजेचे
आ. शिरीष चौधरी म्हणाले की, शेतकर्‍यांना केळीची दर्जेदार रोपे उपलब्ध होणे महत्वाचे आहे.केळी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव हा लागवड क्षेत्रातुन होतो. यामध्ये व्यवस्था पन काळजीपुर्वक केले तर यावर नियंत्रण आणता येईल.यासाठी शेतकर्‍यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. केळी पिकांमध्ये फार मोठा बायोमास हा वाया जातो.त्यावर प्रक्रिया होणे तसेच केळी पिकाची लागवड करतांना दोन झाडातील अंतर वाढविणे या बरोबरच यांत्रिकीकरणाचा सुयोग्य वापर यावर संशोधन होणे गरजेचे आहे.डॉ.शरद गडाख म्हणाले की विद्यापीठाच्या जळगाव येथील केळी संशोधन केंद्राने केळी उत्पादक शेतकर्‍यांना लाभदायक ठरेल असे फुले प्राईड ही नविन वाण संशोधीत करुन ग्रँड-९ या वाणास महत्वाचा असा पर्याय दिला आहे.