खासदार संभाजीराजे म्हणतात, ‘आम्ही मोर्चे काढून वेठीस धरणार नाही तर…’

  नेवासा (अहमदनगर) : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी माझा लढा असून, आम्ही मोर्चे काढून वेठीस धरणार नाही तर न्यायासाठी आता राज्याभर मूक मोर्चा काढणार आहेत. राज्यभर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. यासाठी राज्य सरकारने मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य न झाल्यास पुणे ते मुंबई पायी ‘लाँग मोर्चा’ काढणार असा इशारा दिला. तसेच समन्वयक समितीने मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली असून, आता लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका जाहीर करावी, असे आवाहन खासदार संभाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.
  मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे भोसले यांनी (ता. १६) जूनपासून राज्यव्यापी मूक आंदोलन करनार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवार (ता. १२) रोजी दुपारी नेवासा (अहमदनगर ) व गंगापूर (औरंगाबाद) सीमेवर असलेल्या प्रवरसंगम-कायगाव गोदावरी पुलावर मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
  यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक दशरथ गव्हाणे, विनोद काळे, अविनाश शिंदे, गणेश राऊत, दौलत देशमुख, करण गायकर, आप्पासाहेब कुर्हेकर, उद्धव काळे, संकेत चव्हाण, जयवंत मोटे , अमित सावंत आदी उपस्थित होते.
  खासदार संभाजीराजे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, अंकुश काळे, दत्तात्रय घोलप, नगरसेवक सुनिल वाघ, निरंजन डहाळे, शरद जाधव, भाऊसाहेब फुलारी, आण्णासाहेब गव्हाणे आदी उपस्थित होते.
  नेवासा तालुक्यात जोरदार स्वागत
  हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी नागपूरहून कायगावकडे जात असताना खासदार संभाजीराजे यांचे पांढरीपूल, घोडेगाव, कांगोनी फाटा, वडाळा बहिरोबा, नेवासे फाटा, खडका फाटा, देवगड फाटा, प्रवरसंगम आदी ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले.