संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी ‘पुन्हा’ मुकुंद देशमुख

संगमनेर : लाचखोर पोलीस कर्मचार्‍यामुळे पंधरा दिवसांपूर्वी चौकशीसाठी मुख्यालयात बोलावण्यात आलेले संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख मंगळवारी (ता.२९) सकाळी पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. 

संगमनेर : लाचखोर पोलीस कर्मचार्‍यामुळे पंधरा दिवसांपूर्वी चौकशीसाठी मुख्यालयात बोलावण्यात आलेले संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख मंगळवारी (ता.२९) सकाळी पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत.

गेल्या १२ डिसेंबर रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख याला ‘हरविल्या’च्या प्रकरणात लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहर पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडले होते. विशेष म्हणजे पो.नि.देशमुख यांनी दिवाळीच्या दरम्यान शहर पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक घेवून लाचखोरी व बेशिस्ती खपवून घेणार नसल्याचा सज्जड इशाराही दिला होता. त्यासोबतच परस्पर तडजोडी, प्रलंबित तपास याबाबतही त्यांनी कर्मचार्‍यांचे कान उपटले होते. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर पोलीस ठाण्यात शिस्तीचे पाट वाहत असल्याचे समाधानकारक चित्र अल्पावधीतच संगमनेरकरांना दाखवले होते.

शहर पोलीस ठाण्यातील त्यांच्या उपस्थितीत कोणताही अधिकारी वा कर्मचारी तडजोडी करण्यास धजावत नव्हता. याच दरम्यान 12 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मुख्यालयात ‘गुन्हे बैठकीचे’ आयोजन केल्याने पो.नि.देशमुख बैठकीसाठी नगरला गेले होते. त्याचा फायदा घेत शहर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख याने एका हरविल्याच्या प्रकरणाचा तपास थांबवण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितली होती, ती स्वीकारताना नाशिकच्या एसीबीने त्याला अटक केली होती. त्यानंतर पो.नि.देशमुख यांना चौकशीसाठी तात्काळ मुख्यालयात हजर होण्याचे आदेश बजावण्यात आले. तेव्हापासून ते मुख्यालयात होते. अखेर आज पुन्हा त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.