अनैतिक संबंध बघितल्याने आठ वर्षीय मुलाची हत्या; नेवासा तालुक्यातील घटना

    नेवासा : नेवासा तालुक्यातील वरखेड येथील आठ वर्षीय मुलाची हत्या ही अनैतिक संबंध बघितल्यानेच झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मुलाच्या आईसह आणखी दोघांना अटक करण्यात आली. रामडोह रस्त्याच्या पाटचारी परिसरात डोके छिन्नविच्छिन्न केलेल्या अवस्थेत एका मुलाचा मृतदेह परिसरातील दत्तात्रय जगनाथ गोरे यांच्या शेताजवळील पाटाजवळ वाटसरू याना प्रथम आढळून आला. या घटनेची माहिती समजताच नेवासे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

    मयत मुलाचे नाव सोहम उत्तम खिलारे उर्फ बारकू (वय ८) असे आहे. सोहम हा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मेहेरबाद येथील आहे. परंतु सध्या नेवासा तालुक्यातील वरखेड देवी येथे मंदिरासमोरील एका घरात तो आपली आई सीमा उत्तम खिलारे (वय २७) हिच्याकडे राहत असे. सोहम याची आई ही आपल्या प्रियकर असलेल्या दुसऱ्या नवऱ्याबरोबर गेली चार ते पाच वर्षांपासून राहत होते. घटनेची माहिती वरखेड ग्रामस्थांनी पोलिसांना दिल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक विजय करे, पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर व समाधान भाटेवाल यांनी पोलीस वरखेड येथे भेट दिली.

    याबाबत पोलीस पाटील संतोष घुंगासे यांनी फिर्याद दिली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विजय करे, पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर, भरत दाते, समाधान भाटेवाल तसेच पोलीस कर्मचारी राहुल यादव, महेश कचे, श्याम गुंजाळ, वसीम इनामदार यांनी केला.