शिर्डीत साईबाबा संस्थान कर्मचाऱ्याचा खून

    शिर्डी : गुन्हेगारीनी शिर्डीत पुन्हा डोके वर काढले आहे. नगर मनमाड रस्त्यावर काल रात्री
    साईबाबा संस्थानचे कर्मचारी राजेंद्र धिवर यांचा जीवघेणा हल्ल्यात मृत्यू झाला. साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आरोपींच्या अटकेसाठी आंदोलन सुरू केले.

    राजेंद्र धीवर हे काल संध्याकाळी जोडीदाराबरोबर शिर्डीतील निसर्ग हॉटेल जवळून पायी जात असताना दोन दुचाकींवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धीवर यांच्याकडे काडीपेटीची मागणी केली. ती धीवर यांनी दिल्यानंतर हे हल्लेखोर काही वेळ रसत्याच्या कडेला असलेल्या कंपाऊंडवॉलजवळ जाऊन थांबले. त्यानंतर त्यांनी मागून येऊन धीवर यांचेवर धारधार शस्त्राने वार केले. धीवर यांच्याबरोबर असलेला त्याचा जोडीदार यावेळी घाबरुन गेला. तरीही त्याने हल्लेखोरांना आपल्या हातात असलेल्या डब्याने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हल्लेखोरांनी यालाही मारा, असे म्हणताच त्याने तेथून पळ काढला.

    दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांपैकी दोघांनी धीवर यांच्यावर हल्ला केल्याचे प्रथमदर्शी संजय पवार यांनी सांगितले. हल्ल्यानंतर एका दुचाकीवरील हल्लेखोर राहात्याच्या दिशेने तर एक मोटरसायकल शिर्डीच्या दिशेने निघून गेली. या घटनेनंतर काही काळ धीवर हे जखमी अवस्थेत तेथेच पडुन होते. त्यानंतर पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णवाहिकेतून साईसंस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.