संगमनेरमध्ये नवे चार करोनाबाधित

संगमनेर : शहरातील रहेमतनगरमध्ये आढळलेल्या चौदा नेपाळी तबलिगींपैकी तब्बल चौघांना करोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. २२ फेब्रुवारीला ते नेपाळहून संगमनेरला आले होते.

 संगमनेर : शहरातील रहेमतनगरमध्ये आढळलेल्या चौदा नेपाळी तबलिगींपैकी तब्बल चौघांना करोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. २२ फेब्रुवारीला ते नेपाळहून संगमनेरला आले होते. ४ एप्रिलला त्यांचे स्त्राव चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. तरीही त्यांना संगमनेरमधील चंदनापुरी घाटातील एका रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. २० एप्रिलला त्यांचे पुन्हा स्त्राव चाचणीसाठी पाठविण्यात आले. यावेळी मात्र त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आठ हजार ६९० नागरिकांना होमक्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथ रोग अधिनियम १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार रहेमतनगर, जमजम कॉलनी, अलकानगर, कोल्हेवाडी रस्ता, वाबळेवस्ती, उम्मदनगर, एकतानगर, शिंदेनगर, नाईकवाडीपुरा (संगमनेर शहर) हे क्षेत्र हॉटस्पॉट केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तसेच सदरच्या क्षेत्राच्या मध्यबिंदूपासून जवळपास दोन किलोमीटरचा परिसर हा कोअर एरिया म्हणून घोषित केला आहे.
-सामूहिक नमाज पठण करता येणार नाही
सदर क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्‍यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी २३ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपासून ते ३ मे पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. सदर क्षेत्रातील नागरिकांचे व आगमन-प्रस्थान तसेच सदर क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधित करण्यात आले आहे. रमजान महिना सुरू होत आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून घरपोच किराणा, दूध, तसेच जीवनावश्‍यक वस्तू पुरविण्यात येणार आहेत. तसेच फक्त धर्मगुरूच मशिदीत जाऊन नमाज पठण करतील. सामूहिक नमाज पठण करता येणार नाही. लॉकडाऊन काळात दिलेल्या शिथिलतेचा काही लोक गैरफायदा घेत असल्याचे लक्षात आणून देत सर्वसामान्य लोकांनी करोनला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी घरात बसूनच खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.