माणुसकीचं नातं कसं असावं हे निलेश लंकेंनी दाखवलं; जयंत पाटील यांनी केलं निलेश लंके यांचं कौतुक

कोविड सेंटरमधील व्यवस्था पाहून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक झाले. पारनेर तालुक्याच्या भावळणी येथे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले आहे. या ठिकाणीच ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या कोविड सेंटरला भेट दिली.

    पारनेर : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना रुग्णासाठी कोविड सेंटर उभारून रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी या कोविड सेंटरची पाहणी करून लंके यांचं कौतुक केलं. तर, या कोविड सेंटरमधील व्यवस्था पाहून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक झाले. पारनेर तालुक्याच्या भावळणी येथे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले आहे. या ठिकाणीच ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या कोविड सेंटरला भेट दिली.

    दरम्यान आमदार लंके यांनी संकटाच्या काळात दुःख वाटून घेतले आहे. माणुसकीचं नातं कसं जपावं हे त्यांनी दाखवले. शरद पवार यांचा कार्यकर्ता म्हणून ते शोभतात, असे सांगतानाच जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा पवारसाहेब सामान्यांसाठी धावून जातात. त्याचप्रमाणे निलेश लंके काम करत आहेत, अशा शब्दात पाटील यांनी लंके यांचं कौतुक केले आहे.

    निलेश लंकेही भावूक

    दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या बैठकीदरम्यान लंके यांनी पाटील यांना कोविड सेंटरला भेट देण्याची विनंती केली होती. आमदार लंके यांच्या विनंतीला मान देत अवघ्या दोन दिवसात पाटील पारनेरमध्ये दाखल झाल्याने लंकेही भावूक झाले होते.

    तसेचं जयंत पाटील म्हणाले की, काही दिवसांपासून फक्त ऐकूनच होतो. मात्र आज कोविड सेंटर पाहिल्याने लंके यांचा अभिमान वाटतो. सर्वांची सेवा करण्याचा ‘पण’ त्यांनी घेतला आहे. 14 एप्रिलपासून झोकून काम करत आहेत. लोकांचा आदर्श म्हणून ते उभे राहिले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. सामान्य माणसाची चांगली सेवा लंके यांच्या माध्यमातून होत आहे, असं म्हणत पाटील यांनी लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.