श्रीगोंदा तालुक्यात प्रशासनावर कोणाचाच वचक नाही : बाळासाहेब नाहाटा

  श्रीगोंदा : तालुक्यात कुणाचाच प्रशासनावर वचक राहिला नाही, एकाच राजकीय पक्षाची शहरात दोन-दोन कार्यालय आहेत. पण ती जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नाहीत. त्या कार्यालयात फक्त सेटलमेंट चालते. फक्त सेटलमेंट करण्यासाठी ती कार्यालये आहेत, अशी घणाघाती टीका करत तालुक्यातील हजारो तरुण बेरोजगार आहेत. त्यांना रोजगार कसा मिळेल. यासाठी कुणी प्रयत्न करत नाही. उलट तरुणांना फक्त नादी लावण्याचे काम करून काही नेते त्यांच्या पंटरांना पैसे गोळा करायला लावतात, असा घणाघाती आरोप श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी आज कृषी उत्पन्न बाजारसमितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी राजकीय नेत्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.

  पत्रकार परिषदेला टिळक भोस, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाउपाध्यक्ष अकतार शेख, राष्ट्रवादीचे माजीशहराध्यक्ष बापूराव सिदनकर हे उपस्थित होते. स्वर्गीय शिवाजीराव नागवडे, स्व.कुंडलीकराव जगताप,स्व.सदाशिव आण्णा पाचपुते,स्व.प्रा तुकाराम दरेकर हे नेते होते तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अंकुश होता सामान्यांची कामे पटकन मार्गी लागत होती ही आठवण देखील नाहाटा यांनी करून दिली.

  श्रीगोंदा तालुक्यात सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामाच्या ठेकेदाराला तालुक्यातील एका नेत्याचे दहा ते पंधरा कार्यकर्ते जाऊन खंडणी मागतात काम बंद पाडतात आमच्या नेत्याशी बोला म्हणतात,तो नेता कोण?असा सवाल उपस्थित करून हा गैरप्रकार खपवून घेणार नसून संबंधित ठेकेदाराला घेऊन या खंडणी खोर नेत्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार व दिल्लीत शरद पवार तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुरावे देऊन न्याय मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  अजित पवारांची भेट घेणार असल्यामुळे तो नेता राष्ट्रवादीचा आहे का असे विचारले असता त्यांनी त्याबाबत बोलणे टाळले तसेच खंडणी मागणाऱ्या नेत्याचे नाव जाहीर करा असे सांगितल्यावर त्याबाबत योग्यठिकाणी न्याय मागणार एवढे सांगून त्या नेत्याचे नाव सांगणे त्यांनी टाळले तसेच एक जबाबदार राजकीय व्यक्ती या ठेकेदारकडे सिमेंटच्या गोण्यां मागतोय असा आरोप नाहाटा यांनी केला.

  त्या प्रांताधिकारी,व तहसीलदारांच्या विरोधात आगपाखड तत्कालीन तहसीलदार मी ६५लाख रुपये देऊन श्रीगोंदयात आल्याचे सांगत होते,कोरोना काळात ऑक्सिजन सिलेंडरच्या प्रश्नाबाबत आपण तत्कालीन तहसीलदार व प्रांत याना भेटलो असता त्यांनी आपली थट्टा उडवत प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांनी ती प्रशासनाची जबाबदारी आहे तुम्ही काळजी करू नका असे म्हणून माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगून जर वेळेवर ऑक्सजिन मिळाला असता तर भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष स्व.संतोष खेतमळीस,यांना आपला जीव गमवावा लागला नसता अशी खंत नाहाटा यांनी व्यक्त केली अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांच्यावर टिळक भोस यांनी गंभीर आरोप करून त्यांच्याविरोधात तक्रार देऊनही कार्यवाही होत नसल्याचे सांगितले.

  कुकडीचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांची चौकशी लावणार* कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे व अधीक्षक अभियंता धुमाळ हे जनतेची दिशाभूल करून नेत्यांना नादवतात धुमाळ हे तालुक्यातील असल्यामुळे आत्तापर्यत त्यांच्यावर बोलो नव्हतो परंतु आता मात्र त्यांची चौकशी लावणार आहे असे नाहाटा म्हणाले तर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी काळे व धुमाळ हे भ्रष्ट अधिकारी असून त्यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवली असून ते तालुक्यातील नेत्यांना पैसे देतात त्यामुळे नेते कुकडी पाणी प्रश्नावर काहीच बोलत नाहीत अधिकारी व पदाधिकाऱ्यांची सेटलमेंट असल्याचा आरोप भोस यांनी केला.

  शेलार पाण्यातले तज्ञ,शेलारांनी करेक्ट काम केले कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी घनश्याम शेलार हे पाण्यातले तज्ञ असल्यामुळे त्यांची कालवा सल्लागार समितीवर नियुक्ती केली त्यामुळे शेलार यांनी कर्जतला पाणी मिळवून देण्याचे करेक्ट काम केले त्यामुळे माझा घनश्याम शेलार यांच्यावर अजिबात आक्षेप नसल्याची खोचक टीका नाहाटा यांनी केली.
  शेलारांची ती शाळा जमीनदोस्त करण्याची मागणी घनश्याम शेलार यांची पारगाव रस्त्यावर असणारी शाळा ही अनधिकृत आहे फक्त शेतीची परवानगी असताना त्यावर चार मजली इमारत कशी उभी राहिली.

  याबाबतचा पुरावा सादर करून नगराध्यक्ष दररोज त्या रस्त्याने ये जा करतात मग त्यांना ही बेकायदेशीर इमारत दिसली नाही का असा सवाल उपस्थित करत ती शाळा जमीनदोस्त करावी अशी मागणी करत त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक माझ्या ग्रामपंचायतीची चौकशी लावली मग आता यांची चौकशी कुणी करायची असा टोला नाहाटा यांनी शेलार यांना लगावला.

  भाजप नगरसेवकाला राष्ट्रवादीच्या नेत्याची मदत

  श्रीगोंदा नगरपरिषदेच्या एका भाजप नगरसेवकाचे पद अपात्र झाले पण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सेटलमेंट करत राष्ट्रवादीच्या मंत्र्याची त्या नगरसेवकाला मदत मिळवून देत त्यांचे पद शाबूत ठेवले असा आरोप नाहाटा यांनी केला तर श्रीगोंदयाच्या नगराध्यक्षांना अपात्र करण्याच्या आमच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून या मागणीसाठी आम्ही राज्यमंत्री तनपुरे यांच्या दारात उपोषण करणार असल्याचे टिळक भोस यांनी सांगितले.

  पाणी सुटल्यावर श्रेय घेणाऱ्यांनी, पाणी बंद झाल्यावर सुद्धा जबाबदारी घ्यावी

  तालुक्यातील नेते कुकडीचे आवर्तन सुटलं की ते आवर्तन आपल्यामुळेच सुटले असे सांगतात त्याचे श्रेय घेतात तशी पत्रकबाजी करतात मग पाणी बंद झाल्यावर याच नेत्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी अन्यथा ही पत्रकबाजी थांबवावी असे नाहाटा यांनी सांगितले.

  राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हल्लाबोल

  नाहाटा यांनी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यावर आज हल्लाबोल केला त्यावेळी या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे पदाधिकारी अकतार शेख व माजी शहराध्यक्ष बापूराव सिदनकर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीतच ही गंभीर टीका झाली.