महसूल मंत्री निशाण्यावर; भ्रष्टाचाराचे पुरावे जमवल्याचा भाजपचा दावा

वाळू तस्करीप्रकरणी सात दिवसांत कारवाई करा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा सुजय यांनी दिला आहे. ज्या आमदारांचा वाळू तस्करीला पाठिंबा नाही, त्यांनीही आपल्यासमवेत उपोषणात सहभागी व्हावे, असे आव्हानही त्यांनी केले आहे. त्यांनी थेट महसूलमंत्री यांचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख थोरातांकडेच असल्याचे दिसून येत आहे.

    अहमदनगर : राज्यातील वन आणि गृह खात्याच्या मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला राजीनाम्याचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. भाजपाने रान उठवल्यामुळे या मंत्र्यांना पायउतार व्हावे लागल्यानंतर आता भाजपाने आपला मोर्चा महसूल खात्याकडे वळविला आहे. यासाठी वाळू तस्करीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यासंबंधीचे पुरावे संकलित केल्याचा दावा भाजपचे नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे.

    वाळू तस्करीप्रकरणी सात दिवसांत कारवाई करा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा सुजय यांनी दिला आहे. ज्या आमदारांचा वाळू तस्करीला पाठिंबा नाही, त्यांनीही आपल्यासमवेत उपोषणात सहभागी व्हावे, असे आव्हानही त्यांनी केले आहे. त्यांनी थेट महसूलमंत्री यांचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख थोरातांकडेच असल्याचे दिसून येत आहे.

    भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र खासदार सुजय यांनी थोरात यांच्या महसूल विभागाला बदल्या आणि वाळू तस्करीच्या मुद्यांवरून टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. महसूल मंत्री वाळू तस्करांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी यापूर्वीच केला आहे.