गांजाची शेती करणारा ‘तो’ गजाआड; तीन लाखांचा गांजा जप्त

    अकोले : अवैधरित्या गांजाची लागवड करुन तिची मशागत करुन जवळ बाळगताना एकास अटक केली. त्याच्याकडून 3 लाख 64 हजार 500 रुपयांचा गांजाही जप्त करण्यात आला. अकोले पोलिसांनी ही कामगिरी केली.

    अकोले तालुक्यातील मोग्रस येथील ही घटना आहे. मंगळवारी (दि. 7) मोग्रस ता. अकोले गावच्या शिवारात ठाकरवाडी परिसरात शंकर काळू पारधी हा त्याचे वालवडीचे शेताच्या बांधावर अवैधरित्या गांजाची लागवड करुन ती बाळगत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांना सविस्तर माहिती देऊन त्यांच्याकडून छाप्याबाबत परवानगी घेतली.

    या ठिकाणी राजपत्रित अधिकारी नायब तहसीलदार व्ही. व्ही. खतोडे व स्टाफ असे कारवाईसाठी गेले. त्या ठिकाणी खात्री केली असता या ठिकाणी 24 किलो 300 ग्रॅम वजनाचे रुपये 3, 64, 500 रुपयांचे 16 गांज्याची लहान मोठी झाडे आढळली. तसेच गांज्याची लागवड आणि त्याची मशागत करणारा शंकर काळु पारधी (रा. मोग्रस ता. अकोले जि अ.नगर) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी रवानगी केली असून, त्यास अजून कोणी साथीदार आहे काय, याचा तपास सुरु आहे.

    दरम्यान, नागरिकांना याव्दारे सूचित करण्यात येते की, आपल्या गावात किंवा परिसरात कोठेही अवैध गांज्याच्या झाडाची लागवड, विक्री अथवा वाहतूक होत असेल तर तात्काळ पोलीस ठाण्याला माहिती द्या, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली मिथुन घुगे, सहाय्यक फौजदार सुनिल साळवे, पोलिस नाईक अजित घुले, चालक पोलिस नाईक गोविंद मोरे, बाळासाहेब गोराणे, पोलिस कॉन्स्टेबल आनंद मैड, पोलिस कॉन्स्टेबल आत्माराम पवार, कुलदिप पर्बत, सुहास गोरे, प्रदिप बढे यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास मिथुन घुगे हे करीत आहे.