अखेर नगरचा कांदा लिलाव पूर्ववत; शिवाजी कर्डिलेंच्या शिष्टाईला यश

वाराईच्या मुद्यांवरून खरेदीदार व वाहतूकदारांतील वादामुळे अनिश्चित काळासाठी बंद ठेवला जाणार नगरचा कांदा लिलाव अखेर पूर्ववत सुरू झाला.

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : वाराईच्या मुद्यांवरून खरेदीदार व वाहतूकदारांतील वादामुळे अनिश्चित काळासाठी बंद ठेवला जाणार नगरचा कांदा लिलाव अखेर पूर्ववत सुरू झाला. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची शिष्टाई सफल झाल्याने लिलाव पूर्ववत होणार आहे.

    वाराई हमालीबाबत शिवाजी कर्डिले यांनी बाजार समितीच्या सभागृहात संयुक्त मिटींग घेतली. बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे पाटील, उपसभापती संतोष म्हस्के, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर शिकरे, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बाबा सानप, बाजार समितीचे सचिव अभय भिसे बैठकीला उपस्थित होते.

    ७ सप्टेंबरला राज्य पातळीवर वाराई संदर्भात बैठक होणार आहे. त्यात जो निर्णय होईल त्यावर ८ तारखेला नगरमध्ये बैठक घेतली जाईल. तोपर्यंत जुन्या प्रचलित पध्दतीने काम सुरु ठेवण्यात यावा, असा प्रस्ताव कर्डिले यांनी मांडला. त्याला संमती देत लिलाव पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय झाला. उद्यापासून (दि.४) नगर बाजार समितीत कांदा लिलाव पूर्ववत सुरु राहणार आहेत.