पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या १४ वर्षाच्या नातवाने विहिरीत उडी मारून शेळीला दिले जीवदान

अकोले : तालुक्यातील कोंभाळणे येथील पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांचा इयत्ता ८ वीत शिकणाऱ्या १४ वर्षाचा नातू ऋषिकेश तुकाराम पोपेरे राहणार (पोपेरेवाडी,ता.अकोले) याने चक्क विहिरीत उडी मारून विहिरीत पडलेल्या एका शेळीला जीवदान दिले.

अकोले : तालुक्यातील कोंभाळणे येथील पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांचा इयत्ता ८ वीत शिकणाऱ्या १४ वर्षाचा नातू ऋषिकेश तुकाराम पोपेरे राहणार (पोपेरेवाडी,ता.अकोले) याने चक्क विहिरीत उडी मारून विहिरीत पडलेल्या एका शेळीला जीवदान दिले.

या घटनेबाबत वृत्त असे की,घरी ऋषिकेशची आजी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाचे आयुक्त आणि त्यांची टीम येणार असल्याने घरात लगबग होती .त्यातून घरातील मुलांवर शेळ्या सांभाळण्यास जाण्याची जबाबदारी आली. शेळ्या चरत असताना ऋषिकेश याची नजर चुकून एक शेळी बाजूच्या विहिरीत जाऊन पडली .शेळीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ऋषिकेश धावत विहिरीजवळ गेला.आपल्या कळपातीलच ती शेळी आहे याची खात्री त्याला झाली .कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता त्याने तत्काळ विहिरीत झेप घेत त्या शेळीला मृत्यूच्या दारातून परत आणले. चिमुरड्या ऋषिकेशचे हे साहस बघून सर्वांनाच आश्चर्य झाले .

इयत्ता ८ वीत शिकणारा आणि मुळातच खेड्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या ऋषिकेशला निसर्गातील अनेक गोष्टींबद्दल उत्तम ज्ञान आहे. त्यामध्ये मित्रांसोबत त्याने पाण्यात पोहण्याची कला अवगत केली होती .तीच कला त्याला या कामी आल्याचे बोलले जात आहे. ऋषिकेश अत्यंत धाडसी आणि लढऊ वृत्तीचा आहे. अनेकदा त्याने वाघाशी संघर्ष करून घरातील पाळीव प्राण्यांचे जीव वाचविले आहेत. जंगलातील मधमाशांचे मध काढणे असो किंवा कोणाच्या घरात बसलेला मोठा नाग असो त्याला पकडण्याची कला त्यांने अवगत केलेली आहे. अजगरासारख्या सरपटणार्‍या महाकाय प्राण्यांसोबतही तो खेळण्यासारखे खेळतो. पोहणे, धावणे ,झाडावर चढणे,जंगलात फिरायला जाणे, जंगलातील विविध झाडांची माहिती गोळा करणे, उपयुक्त फळे व फुले यांचा संग्रह करणे ,पावसाळ्यात वेगवेगळ्या आकारांची खेकडे गोळा करून आणणे असे अनेक प्रयोग ऋषिकेशचे सुरू असतात . त्यातूनच ऊन, वाऱ्यात ,पावसात फिरणारा ऋषिकेश शरीराने अत्यंत काटक आणि मनानेही तितकाच कणखर बनला. तोच कणखरपणा त्याला स्वतःची शेळी वाचवताना काल आल्याचे बोलले जात आहे .ऋषिकेशने दाखविलेल्या धाडसाबद्दल ग्रामस्थांनी त्याचे मनापासून कौतुक केले आहे.