नगरमध्ये दोन्ही काँग्रेसमध्ये बिघाडी; राष्ट्रवादी आमदाराची काँग्रेस शहराध्यक्षाला एक कोटीची नोटीस

  अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : काँग्रेसने केलेल्या आयटी पार्क पोलखोल प्रकरणाचे वातावरण अजूनही शांत व्हायला तयार नाही. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा नामोल्लेख टाळत ते अदखलपात्र असल्याचे सांगणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी काळे यांना १ कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस पाठविली आहे. त्याला काळे यांनी ८ पानांचे लेखी प्रत्युत्तर दिले असल्याची माहिती किरण काळे यांनी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दिली. यानिमित्ताने नगर शहरात काँग्रेस-राष्ट्रवादीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता हे प्रकरण कोणते राजकीय वळण घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  मुख्यमंत्री सहाय्यता निधीत भरा पैसे

  २ सप्टेंबर रोजी काळे आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आयटी पार्कची पाहणी करत पोलखोल केल्याचा दावा केला होता. त्याच रात्री उशिरा काळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्याठिकाणी पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी बसून होते. म्हणून खोटा गुन्हा दाखल झाला असा आरोप काळे यांनी यावेळी केला होता. त्यानंतर ३ सप्टेंबरला काळे-जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर आरोपांची राळ उठवीली होती.

  अ‍ॅड. किशोर देशपांडे यांच्या मार्फत जगताप यांनी काळे यांना आयटी पार्क प्रकरणावरून केलेले आरोप आपली बदनामी करण्याच्या हेतूने केले असल्याचे म्हणत १० दिवसांच्या आत १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९ या खात्यात भरून त्याची पावती त्यांना पाठवण्याची नोटीस पाठवली आहे. नुकसान भरपाई न दिल्यास फौजदारी गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसद्वारे कळविले आहे.

  मला नोटीस प्राप्त झाली असून त्याला मी कायदेशीररित्या लेखी उत्तर दिले आहे. एखाद्या गोष्टीतील सत्य मांडणे म्हणजे एखाद्याची बदनामी करणे असे म्हणणे चुकीचे आहे. तथाकथित आयटी पार्कची काँग्रेसच्या पथकाने स्वत: पाहणी केली असून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण आमच्याकडे उपलब्ध आहे. ते नगरकरांसमोर आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दाखविले आहे. विरोधक प्रचंड अस्वस्थ झाले असून एका मागे एक गुन्हे दाखल करणे, खटले दाखल करण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. घाबरणे हे माझ्या रक्तात नसून छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे अपप्रवृत्तींच्या विरोधात लढत राहणे हे मला माहित आहे.

  – किरण काळे, शहरजिल्हाध्यक्ष, काँग्रेस.