दहा हजार घरांची बत्तीगुल; ग्राहकांकडे ४७७ कोटी थकबाकी

  अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : वारंवार आवाहन करूनही थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांना वीज वितरण कंपनीने झटका देत लाईट कट केली. परिणामी जिल्ह्यातील दहा हजार घरांची बत्ती गुल झाली आहे. आता थकबाकीसोबतच पुर्नजोडणी शुल्काचा भुर्दंड या ग्राहकांच्या माथी पडला आहे.

  जिल्ह्यातील ३ लाख १८ हजार ग्राहकांकडे वीज वितरण कंपनीचे ४७७ कोटी रूपयांची थकबाकी आहे. नाशिक परिमंडलातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे, सार्वजनिक सेवा वर्गवारीच्या ७ लाख २९ हजार ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ८५५ कोटी ४० लाख रुपये थकबाकी आहे. महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने थकबाकी वसूली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे.

  ==========

  अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख १८ हजार ६८५ थकबाकीदार

  जिल्ह्याची थकबाकी ४७७ कोटी १६ लाख

  ऑगस्ट महिन्यात १०२६० वीज कटींग

  घरगुती ग्राहक पुर्नजोडणी शुल्क २३६

  ग्राहक वर्गवारी थकबाकीदार ग्राहक थकबाकी रुपये

  घरगुती २७८००० ५५ कोटी ८४ लाख

  वाणिज्यिक २७४०४ १३ कोटी ३९ लाख

  औद्योगिक ३८४८ ३ कोटी ७६ लाख

  पथदिवे ३५३७ ३४२ कोटी ९६ लाख

  पाणी योजना १६५९ ५८ कोटी १२ लाख

  सार्वजनिक सेवा ४१८३ ३ कोटी ७ लाख

  ===========

  दरमहा सातत्याने पाठपुरावा करून ग्राहकांना नित्यनेमाने संपर्क करून सुद्धा वीजबिलांची थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय आहे. ग्राहकांना वेळेत वीज बिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहका़नी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडीग ,वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश दिले जातात, पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव कठोर पाऊले घेत वसूली मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

  विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वा ईमेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविली जात आहे. नोटीसचा विहित कालावधी संपताच ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे.