प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांची सत्ताधाऱ्यांकडून मुस्कटदाबी; काळ्या फिती लावून निषेध

  नगर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांची सत्ताधाऱ्यांकडून मुस्कटदाबी केल्यामुळे रोहोकले गुरुजी प्रणित गुरूमाऊली मंडळाने काळ्या फिती लावून व निषेधाचे फलक दर्शवित जाहिर निषेध केला असून वार्षिक सर्वसाधारण सभा ही विरोधकांना मत मांडण्याचे व्यासपीठ असते ते सत्ताधाऱ्यांकडून उपलब्ध करून देणे अपेक्षित होते परंतु सभासदांना बोलून दिले जात नसल्यामुळे बँकेच्या सभेस्थळी उपस्थित राहून निषेध व्यक्त केला आहे. घोटाळ्यावर घोटाळे करण्याचा विक्रम यांनी केला असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे आणि विकास डावखरे यांनी केला आहे.

  जिल्हा प्राथमिक बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष सलीम पठाण यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल पॅराडाइजवर आयोजित करण्यात आली होती. या सभेत विरोधकांसह सभासदांना बोलू दिले जात नसल्याने विरोधकांनी सभागृहात प्रवेश देण्याची मागणी केली होती. परंतु मुजोर सत्ताधाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावत हुकूमशाही वृत्तीचे प्रदर्शन पुन्हा एकदा केले.
  यावेळी संजय शिंदे, संजय म्हस्के, राम निकम, बाबा पवार, संजय दळवी, संतोष खामकर, दशरथ ढोले, बाबासाहेब धरम, राजेंद्र ठुबे, बाळासाहेब वाबळे, गणेश वाघ, संतोष निमसे, राजू कर्डीले, संतोष ढोले आदी उपस्थित होते.

  दरम्यान, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे म्हणाले की, विषय पत्रिकेत स्थळ जाहिर करणे आवश्यक असताना काल पर्यंत विरोधी संचालकांना आणि सभासदांना स्थळच माहित नव्हते. त्यामुळे आजची शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे सत्ताधाऱ्यांचा पोरखेळ झालेला दिसून आला.

  बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी जसे घड्याळे खरेदी करण्यासाठी गुजरात गाठले तसे ऑनलाईन सभेसाठी तारांकित हॉटेल का निवडले!? हा मोठा प्रश्न आहे. यांना फक्त घोटाळे घालण्यासाठी विषय लागतात. कशाला कशाचा पायपोस न राहिलेल्या सत्ताधाऱ्यांनी आता मुदत संपून गेल्यामुळे नैतिकता असेल तर राजीनामे देऊन पायउतार व्हावे असे आवाहन प्रवीण ठुबे यांनी केले.

  विरोधी संचालकांना सुद्धा सभागृहाबाहेर ताटकळ ठेवून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी व्यक्तिदोषाचे प्रदर्शन घडवले असून जाणीवपुर्वक रोहोकले प्रणित संचालकांना काही काळ सभागृहाच्या बाहेर उभे करण्याचाही यावेळी संजय म्हस्के यांनी निषेध व्यक्त केला.

  विद्यमान चेअरमन यांनी चक्काचूर केला आहे वास्तविक पाहता शंभर वर्षांची परंपरा असणारे बँकेला स्वतः ऐक्य मंदिर हे मोठे कार्यालय असताना खाजगी हॉटेलमध्ये बैठक घेण्याची आवश्यकता नव्हती. चेअरमन गेल्या आठ दिवसापासून सदर हॉटेलमध्ये मुक्कामी असून त्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च करावा. सभासदांच्या घामाचे पैशावर ऐशाराम करू नये. या संचालक मंडळाचा इतिहास हा बँकेचे इतिहासामध्ये काळ्याकुट्ट अक्षरांमध्ये लिहिला जाणार आहे.

  घोटाळ्यांच्या माध्यमातून ही मंडळी लाखो रुपये कमावत आहेत. या संचालक मंडळाने राजीनामा देऊन निवडणुकीचा मार्ग मोकळा करणं गरजेचं होतं, परंतु धूळफेक करणे हा त्यांचा नित्याचा प्रकार झाला असून या सर्व प्रकाराला सभासद कंटाळले आहेत. थोडीफार तरी जनाची नाही तर मनाची लाज असेल तर सर्व संचालकांनी तात्काळ राजीनामे द्यावेत, अशी मागणी रोहोकले गुरुजी प्रणित मंडळाचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनी केली आहे.