मंदिर बंद ठेऊन संकट टाळता येऊ शकेल हा सरकारचा भ्रम : विखे-पाटील

    लोणी : मंदिर बंद ठेवून संकट टाळता येऊ शकेल हा महाविकास आघाडी सरकारचा भ्रम असल्याची टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. कोणत्याही उत्सवावर बंधन घालण्यापेक्षा नियम करून उत्सव साजरे करू दिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशाची स्थापना राधाकृष्ण विखे पाटील आणि शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विखे-पाटील कारखाना कार्यस्थळावर परंपरेने करण्यात आली. कोविड संकटामुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय उत्सव समितीने घेतला आहे.

    पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखाना कार्यस्थळावर राधाकृष्ण विखे आणि शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा करून या गणेशोत्सवाचा प्रांरभ करण्यात आला. याप्रसंगी प्रवरा उद्योग समूहातील विविध संस्थांचे संचालक अधिकारी आणि कामगार उपस्थित होते.

    माध्यमांशी संवाद साधताना विखे यांनी सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाचे संकट कायमस्वरूपी जावे आणि सर्वाच्याच जीवनात पुन्हा स्थिरता येवू दे हीच प्रार्थना गणेशाकडे असल्याचे विखे पाटील म्हणाले. कोणत्याही धर्माचे उत्सव हे नियम करून साजरे करू द्यायला पाहिजे. परंतु, सरकार जाणीवपुर्वक तसे निर्णय करीत नाही. मंदिर तातडीने सुरू करावीत ही आपली मागणी कायम असल्याचे स्पष्ट करून मंदीर बंद ठेवून कोरोना संकट टळेल हा सरकारचा भ्रम असल्याची टिकाही त्यांनी केली. उत्सव साजरे करायचे नाहीत या सरकारच्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.